आषाढी एकादशी : कुठं जाऊ दूर..! | पुढारी

आषाढी एकादशी : कुठं जाऊ दूर..!

नितीन विनायक कुलकर्णी

ठेवला तर विश्वास, न्हाई तर नुसता भास, असं भक्तीचं सूत्र हाय. आता या संकट काळात लाखमोलाची मदत करणार्‍या, धीर देण्यासाठी पाठीशी उभ्या राहणार्‍या माणसाच्या रूपात ही माऊली आपल्यासोबत हाय हे जाणून त्यो भाव जपाय पायजे.

‘पुंडलिक वर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम…’ आषाढी एकादशीच्या हरीनामाच्या गजरानं, अभंग, भारुड, गवळणीच्या सुरानं, टाळ-मृदंगांच्या तालानं धरणी डोलाय लागती. संतांच्या पालख्या, भगव्या पताका, विठूरायाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या गावोगावच्या दिंड्यास्नी आभाळ न्हाऊ घालतं. ‘एक तरी वारी अनुभवावी’, असं संतांनी म्हणलेलं हाय. त्याचं कारण काय? तर वारीचं वर्णन वाचून कळतंय. पण ज्यानं ही बंधुभाव, समानता, जिव्हाळा जपणारी वारी अनुभवली ते थेट हृदयाशी जुळतंय. शेकडो वर्षापास्नं अखंडपणे चालत आल्याली ही भक्तिभावाची परंपरा दोन वर्षे खंडित झाली. काळजीपोटी म्हणून नियमांच्या चौकटीत बंदिस्त झाली. रीत बदलून रिवाज पूर्ण करावा लागतोय तवा ‘आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना’ हीच समजूत आपल्या मनाला घालण्याशिवाय दुसरा शहाणपणाचा पर्यायच न्हाई. प्रापंचिक लेवलला जवा एखादी गोष्ट थांबती तवा आपलंच काय चालत न्हाई असं म्हणून आपण गप बसतो तसं आता सामाजिक लेवलला बी म्हणायचं आणि घरात थांबायचं. अवो, आपण जे आता म्हंतोय ते संतांनी कवाच आपल्याला सांगितल्यालं हाय. देह धड तोवर प्रपंचाची वढ. हातपाय चालंनात म्हणलं की ‘कुठं मी जाऊ दूर, माझं इथंच पंढरपूर’… तसं आता ह्यो समजुतीतला सुज्ञपणा स्वीकारावा आणि ही भगवंताची इच्छा समजावी. या सुधारलेल्या विज्ञान युगात माणसं देवाला दूर ठेवायची भाषा कराय लागलीत म्हणून देवानंच सरसकट भक्तांस्नीच वाईज दूर ठेवलंय. कोंच्या बी गोष्टीत आपण कायम भल्याचा विचार करावा. देव पांडुरंग संतांच्या, भक्तांच्या वात्सल्यात एकरूप झाला आणि एकाच मंदिरात असून अर्धांगी रुक्मिणीपास्नं दूर राहिला. आपल्या भेटीसाठी देवाच्या नात्यात अंतर यावं ही कोंची भक्ती? देव कायम भक्तांचं हित बघतो. आता या निमतानं का असंना, आपण त्याची ‘लेकरं’ म्हणून ‘माऊलीचा’ थोडा विचार करण्याची भक्ती करूया की.

वैष्णवांचा मेळा जमला की पांडुरंगाचं भान हरवतं हे आपण अभंगातनं, कीर्तनातनं ऐकलंय. या दोन वर्षात चंद्रभागेला नेहमीसारखं पाणी हाय. पण भक्तांचा पूर न्हाई, हेची चिंता विठूराया आणि माय चंद्रभागेला हायच की. भेटीची आस लागली की भगवंत कोंच्या बी रूपात दिसतो. ही भावना संत सावता माळी आपल्या अभंगात अशी म्हंत्यात, शेत विठ्ठल, पाणी विठ्ठल, बैल विठ्ठल गे. विठ्ठलवानी मोट काळी ती बी विठ्ठल गे. चिमणी विठ्ठल, मैना विठ्ठल, राघू विठ्ठल गे. मैनेवानी नागू (सावता माळी ह्यांच्या मुलीचं नाव) माझी ती बी विठ्ठल गे.

संबंधित बातम्या

वारीला जाणं झालं न्हाई तर पांडुरंगानं त्या मळ्यात येऊन दर्शन दिलं. ठेवला तर विश्वास न्हाई तर नुसता भास असं भक्तीचं सूत्र हाय. आता या संकट काळात लाखमोलाची मदत करणार्‍या, धीर देण्यासाठी पाठीशी उभ्या राहणार्‍या माणसाच्या रूपात ही माऊली आपल्यासोबत हाय हे जाणून त्यो भाव जपाय पायजे. देव आपल्याला सावध करतो तसं देवाला बी त्याचं भक्त सावध करत्यात. ही तुमाला गंमत वाटंल; पण गंमत न्हाई बर का. तर काल्याच्या अभंगात हाय हे.

एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. नाचे संतांचा मेळा भोवती गोपाळाची दाटी. जनी म्हणे बोला नामदेवा सांगा अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नाचता खेळता देवाचा घळला पितांबर. सावध व्हा ओ देवा ऐसा बोले कबीर.

अशी संतांच्यात,भक्तांच्यात तल्लीन होणारी विठूमाऊली आपल्या लेकरांपास्नं कधीच दूर न्हाई. ती आपल्यातचं हाय. वारकर्‍यांचं माहेर पंढरपूर. विठ्ठलाच्या भेटीला येणार्‍या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम यांच्या पालखीचे आणि शब्दब्रह्म सावळ्या हरीचे दर्शन तिथं जाऊन होणार न्हाई ह्याची हुरहुर मनाला लागली तरी नाईलाज हाय. आपल्याला वाटतंय तसं परदेशातनं खास ह्यो सोहळा बघायला अनुभवायला येणार्‍या भक्तास्नी बी जिव्हाळा दुरावल्यावानी झालंय. लाखात माणसांची संख्या. सक्ती नसून बी सगळं शिस्तबद्ध. ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे बयाजवार हेचं त्या परदेशी पाहुण्यास्नी नवल वाटतंय. ही नेमकी काय शक्ती हाय हेचा ती अभ्यास करायला हिथं येत्यात आणि तेंची भाषा मराठी नसून भजनात तल्लीन हुत्यात ही चंमत ग न्हवं तर आपल्या बंधुभावाचा, आपुलकीचा त्यास्नी मनापास्नं पटल्याला साक्षात्कार हाय. आरं बाबानू, आपलं काळीज वढ घेतंय हेची काळजी त्या पांडुरंगाला हाय. खरं देवाला सवड द्यायला आपण थोडा कड काढाय पायजे. एकादशीला त्यो आपल्याला दर्शन देणार खरं, डोळं भरून बघायसाठी दृष्टी चौफेर आणि डोळं उघडं ठेवूया.

Back to top button