Latest

दिल्लीतील यूपीएससी केंद्र होणार कार्यान्वित : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रस्तावित यूपीएससी केंद्रासाठीचा पाठपुरावा अंतिम टप्प्यात असून, लवकर ते कार्यान्वित होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. या केंद्रात राज्यातील 100 उमेदवारांची निवास व अध्यापनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने या पुढील सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

शिवनई (ता. दिंडोरी) येथे शुक्रवारी (दि.17) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र भूमिपूजन सोहळ्यानंतर ना. सामंंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य शासनाकडून चालविण्यात येत असलेल्या यूपीएससी केंद्रांमधून यंदाच्या परीक्षेत 23 विद्यार्थ्यांनी बाजी मारली. भविष्यात यूपीएससी देणार्‍या उमेदवारांच्या सुविधेसाठी तातडीने दिल्लीतील वसतिगृह सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या अधिवेशनात राज्याचे शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीबाबतच्या तरतुदीचा प्रस्ताव हा राजभवनकडून राष्ट्रपती भवनाकडे सादर करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनाच्या स्वाक्षरीअभावी हा प्रस्ताव अडकून पडल्याने कुलगुरू निवडी रखडल्याचे ना. सामंत यांनी मान्य केले. दीक्षांत सोहळ्याला मराठी टच : विद्यापीठांमधील दीक्षांत सोहळ्यात बदल करताना त्यांना मराठी संस्कृती व संस्काराचा टच देण्याचा मानस सामंत यांनी व्यक्त केला. त्यासाठी राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेत येत्या जूनपासून हा बदल करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपकेंद्राच्या 63 एकर जागेत स्किल डेव्हलपमेंटचे एक संकुल असेल. तेथे वायनरी, आदिवासी संस्कृती, पैठणी, तांबा-पितळे भांड्यांचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम राबविले जातील, असे सामंत म्हणाले.

राज्यसभेत चूकच झाली : राज्यसभेत आमची काहीशी चूक झाल्याची कबुली देताना, तिन्ही पक्षांनी समान 42 मतांचा कोटा संरक्षित करणे आवश्यक होते. त्यामुळे सेनेचे संजय पवार निवडून आले असते, असे सामंत म्हणाले. विधान परिषदेत सेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यसभा निवडणुकीत आमदारांना फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यावरून भाजपने टीका केली होती. तोच धागा पकडत, आता भाजपला त्यांचे आमदार फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्याची वेळ का आली, असा रोखठोक सवाल सामंत यांनी उपस्थित करीत भाजपवर निशाणा साधला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT