संजीवनी माचीचा तीव्र उतार वाढवतो काळजाचा ठोका

संजीवनी माचीचा तीव्र उतार वाढवतो काळजाचा ठोका

राजेंद्र खोमणे

नानगाव : स्वराज्याची पहिली राजधानी पाहून रायगडाकडे जाताना आपल्याला बालेकिल्ल्याच्या दोन्ही बाजूंच्या पायथ्याने अवघड पाऊलवाटेने जाता येते. बालेकिल्ल्याला वळसा घालताना छोटी व अवघड पायवाट तुडवत पुढे जावे लागते. वर बालेकिल्ल्याचा सरळसोट कातळ आणि खाली खोल दरी, त्यामुळे हा प्रवास खूपच अवघड आहे. त्यातच बालेकिल्ल्याच्या काळ्या कातळाला मोठमोठ्या आगी मोहळ असल्याने अनेक संकटे पार करीत आपण राजगडाच्या संजीवनी माचीवर पोहचतो.

संजीवनी माचीचे दुहेरी तटबंदी बांधकाम, बुरूज, दरवाजे, पाण्याच्या टाक्या हा शिवकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. संजीवनी माचीची लांबीदेखील मोठी आहे. माचीची भव्यता पाहूनच गड किती अभेद्य असेल, याची लगेच कल्पना येते. या माचीवरदेखील घरांचे पडलेले अवशेष आढळतात. माचीवरील टेहळणी बुरुजांवरून दूरवर नजर ठेवता येते, तसेच या माचीवरील पाण्याच्या तलावात बाराही महिने पाणी असते. मात्र, ते पिण्यायोग्य नसते. माचीच्या पहिल्या दरवाजातून आपण व्याघ्रमुखाजवळ पोहचतो.

व्याघ्रमुख म्हणजे समोरच्या संजीवनी माचीवर लक्ष ठेवण्यासाठीची जागा आहे. या ठिकाणच्या एका दगडी खिडकीतून समोरच्या माचीवर नजर ठेवता येते. याच व्याघ्रमुख बुरुजाजवळच्या दरवाजातून पुढे आळू दरवाजातून तोरणा व पुढे रायगडाला जाता येते. संजीवनी माचीच्या आळू दरवाजातून उताराने खाली उतरत आपण संजीवनी माचीच्या पुढच्या टोकाला पोहचतो. मात्र, या वेळी आपण माचीच्या वरच्या बाजूला पाहिले, तर संजीवनी माचीची उंची व भव्यता लक्षात येते.

संजीवनी माचीवरून गडउतार होताच समोर उभा राहतो तो संजीवनी माचीचा तीव्र उतार. निसरडी वाट, छोटेमोठे दगड, पायाखालून घसरणारे छोटे खडे, सरळसोट कडा उतरणे खूपच अवघड आहे. यातच जर आपणाकडे वजनदार बॅग असेल तर हा उतार आणखीनच अवघड होऊन बसतो. त्यामुळे शत्रूला काही वस्तू माचीपर्यंत आणणे किती कठीण असेल, याचा अंदाज येतो. जेथे एकट्या माणसाला चढाई करणे व उतरणे कठीण आहे, तिथे शत्रूची काय बिशाद..? क्रमश:

शिवछत्रपतींच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि कायमची राजधानी रायगड हा 125 किलोमीटरचा प्रवास प्रत्येक शिवप्रेमीला पर्वणीच ठरेल असा आहे. सह्याद्रीचे डोंगर, दर्‍या, जंगल, पाऊलवाट तुडवत होणारा हा प्रवास स्वर्गसुखाचा आनंद देणारा नयनरम्य
असा आहे. या प्रवासातील चित्तथरारक प्रसंग, इतिहासाच्या पाऊलखुणा दाखविणार्‍या वास्तू, नैसर्गिक वैशिष्ट्ये यासंबंधीची मालिका…

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news