नगर : काष्टीतील पाणी योजना नावालाच! | पुढारी

नगर : काष्टीतील पाणी योजना नावालाच!

काष्टी : पुढारी वृत्तसेवा: श्रीगोंदा तालुक्यातील सर्वांत जास्त लोकसंख्येचे, मोठ्या बाजारपेठेचे आणि तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून काष्टी गावाची ओळख आहे. सन 2017 मध्ये घोड धरणावरुन 19 कोटी रुपयांची पाणी योजना राबवून सुद्धा गावातील अनेक वॉर्डात, वाडीवस्तीवर नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून आणलेली ही पाणी योजना फक्त नावालाच आहे का? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.

गावचे नेते तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा परिषद सदस्य स्व.सदाअण्णा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून, आमदार पाचपुते यांनी शासन दरबारी पाठपुरावा करुन 2017 साली घोड धरणावरून बंद पाईपमधून सुमारे 19 कोटी रुपयांची नळपाणी योजना गावात आणली.

परंतु, ग्रामपंचायत सदस्यांच्या उदासिनतेमुळे गावातील पाणी वाटपात योग्य नियोजन नाही. सर्व ठिकाणी अनियमितता असल्यामुळे गावात अनेक नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. पाणी योजनेचे नळ कनेक्शन हे व्यक्ती पाहून दिले गेले आहे. श्रीमंतांना एक इंची व गरिबांना अर्धा इंची नळ कनेक्शन असा ग्रामपंचायतीचा भेदभाव का? श्रीमंताच्या पाईपलाईनला विद्युत मोटारी, गरिबांचे काय? असा सवाल केला जात आहे.

पीओपी मूर्ती उत्पादनावर केंद्राने घातली बंदी

गावातील वाडीवस्तीवरील लोकांना पाणी मिळावे, म्हणून याच पाणी योजनेतून सर्व एक ते सहा वॉर्डात दोन ते पाच कोटी रुपये खर्चून पाण्याच्या टाक्या बांधल्या. परंतु, पाच वर्षांत एकाही टाकीत पाणी गेले नाही आणि सामान्य नागरिकांना पाणी मिळाले नाही. वॉर्ड एकमध्ये चौधरी मळा टाकी बांधून पूर्ण आहे, पण मिळत नाही. वॉर्ड क्र.दोन संतवाडी येथे पाण्याच्या तीन टाक्या आहेत, पण एकाच टाकीतून लोकांना पाणी मिळते. बाकी दोन टाक्या बंद आहेत.

वॉर्ड क्र. तीन राहिंजवाडी,पाचपुतेवाडी येथे फक्त पाण्याच्या टाक्या उभ्या असून, त्या पाण्यावाचून कोरड्याच आहेत. वॉर्ड क्र.चारमध्ये टाकी बांधून सहा वर्षे पूर्ण झाली, पण पाणी काही येईना. वॉर्ड क्र.पाच साईनगर येथे टाकी बांधून पाच वर्षे झाली, पण पाणी येईना. वॉर्ड क्र. सहा पुनर्वसन पाणी योजना पूर्ण झाली, पण पाणी नाही.

गावाची लोकसंख्या आता 25 हजाराच्या पुढे झपाट्याने वाढत आहे. पण प्रत्येक वॉर्डात कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या पाण्याच्या टाक्या कोरड्याच असल्याने येथील नागरिक पाण्यावाचून वंचित आहेत. ग्रामपंचायतीची पाणी वितरण व्यवस्था चांगली नाही. सदस्यांचे त्याकडे लक्ष नाही. गावातील महिला सरपंचपद नावालाच आहे.

त्यांचे नातेवाईकच कारभार पाहत असल्याने गावाला योग्य दिशा मिळेना. त्यामुळे गावागाडा रुळावर येण्यासाठी नेत्यांना कडक भूमिका घेऊन चार महिन्याने होणार्‍या निवडणुकीत कार्यक्षम सदस्य निवडून देणे गरजेचे आहे. तरच गावचा कारभार चांगला चालेल. अन्यथा सामान्य नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून आणलेली पाणी योजना उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था सध्या झाली आहे.

काष्टीने बेलवंडीचा आदर्श घ्यावा
आमदार पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली काष्टीत महिला सरपंच म्हणून सुलोचना वाघ व आश्विनी पवार या जनतेतून निवडून आल्या. परंतु, त्यांना कामाची चुणूक दाखविता आली नाही. तर, दुसरीकडे आमदार पाचपुते यांच्याच मार्गदर्शनाखाली बेलवंडी येथे सुप्रिया पवार या जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी गावचा कायापालट केला. एका सुशिक्षित महिलेने एक आदर्श ग्रामपंचायत करून दाखविली आहे. या बेलवंडी ग्रामपंचायतीचा आदर्श काष्टीच्या सरपंच व सदस्यांनी घेण्याची गरज आहे.

‘त्या’ पाणी योजनेला विरोध का?
पाच कोटी रुपये खर्चून नलवडे वस्तीवर होणार्‍या नवीन पाणी योजनेला अनेकांचा विरोध आहे. कारण सदर योजना जास्त लोकवस्ती असलेल्या गवते वस्तीजवळ व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसा प्रस्ताव डॉ.बाळासाहेब पवार यांनी ग्रामपंचायतीला दिला आहे.

Back to top button