Latest

‘ढाेंगी मनोहर भोसलेपासून बाळूमामा भक्तांनी सावध रहावे’ : बाळूमामा देवालय समितीचे आवाहन

नंदू लटके

कोल्हापूर, मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र आदमापूर, ता. भुदरगड येथील सद्‍गुरु बाळूमामा हे एक आधुनिक युगातील असाधारण संत पुरूष आहेत. अशातच बाळूमामांच्या नावावर काही ढोंगी भोंदूबाबा अंधश्रध्दा पसरविण्‍याचे काम करीत आहेत. या पैकी मनोहर भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा) हा एक असून, तो ढोंगी व लबाड आहे.  मनोहर भोसले याचा आणि बाळूमामा देवालय आदमापूर यांचा काहीही संबंध नाही, असे बाळूमामा देवालय समितीचे कार्याध्यक्ष श्री. रामभाऊ मगदूम, अध्यक्ष श्री. धैर्यशील भोसले व सेकेटरी श्री. रावसाहेब कोणकेरी यांनी कोल्हापूर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत स्‍पष्‍ट केले. अशा भोंदूबाबापासून बाळूमामा भक्तांनी सावध रहावे, असे आवााहनही त्‍यांनी केले.

या वेळी बाळूमामा देवालय समितीचे कार्याध्यक्ष श्री. रामभाऊ मगदूम म्‍हणाले, सन १९६६ साली बाळूमामांनी आदमापूर येथे आपला देह ठेवला आणि आदमापूरवासियांसह भक्तगणावर मोठी कृपा ठेवली. सध्या बाळूमामांची २२ हजार बकरी आहेत.

महाराष्ट्र कर्नाटकात १६ (सोळा) ठिकाणी ती बग्गाच्या माध्यमातून मजल दरमजल करीत बाळूमामांचा महिमा भक्तांना सांगण्याचे एक प्रकारचे काम करत आहेत. काही भक्त भक्तिभावाने, काहीजण मानधन तत्वावर त्यांची राखण करीत आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

सद्‍गुरु बाळूमामा हे एक आधुनिक युगातील असाधारण संत पुरूष आहेत. आपले संपूर्ण आयुष्य अंधश्रध्देविरोधात घालवून सर्वसामान्य माणसांना अंधश्रध्देच्या जोखडातुन मुक्त करण्याचे काम त्यांनी केले.

मुक्या प्राण्यांची सेवा करून त्यांनी समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. मुक्या प्राण्यांची सेवा करा, असा संदेश त्यांनी कृतीतून दिला आहे.

बाळूमामांची किर्ती सध्या जगभर पसरत आहे. भक्तांची बाळूमामांवर अपार श्रध्दा वाढत आहे. यामुळे आदमापूर हे ठिकाण अल्पावधीतच बाळूमामांमुळे जगात प्रसिध्द हो आहे.

देश-परदेशातील पर्यटक ही या धार्मिक स्थळी येतात आणि मामांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत आहे.

भोंदूबाबापासून सर्वांनी सावध राहावे

बाळूमामांच्या भक्तांचा वाढता प्रतिसाद पाहुन जशी बकरी पुढे जातील तसे काही ढोंगी साधू निर्माण होत आहेत.

बाळूमामांचा भंडारा देऊन आपला आर्थिक फायदा करून घेत आहेत. अशा भंडारा देणाऱ्या व बाळूमामांच्या भक्ताची लूट करणाऱ्या तांत्रीक मांत्रीक भोंदूबाबापासून सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.समितीकडून अशा कोणत्याही कृतीचे समर्थन केले जात नसून बाळूमामांच्या नावान भंडारा देणाऱ्या बुवांनी सावध राहावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

बाळूमामांच्‍या बकर्‍याचे कळप ज्या ठिकाणी आहे त्याठिकाणी आणि आदमापूर येथील मंदिरात असणाऱ्या दानपेटी मध्येच भरून देणगी देतात. आदमापूर येथील बाळूमामा मंदिरामध्येच देणगीची अधिकृत पावती दिली जाते. अन्यत्र कुठेही अशा पावत्या दिल्या जात नाहीत. याची भक्तांनी नोंद घ्यावी.

अन्यत्र बाळूमामांचे नावावर जर कोण तुमच्याकडे पैसे मागत असेल तर आपण देवु नयेत दिलेत तर बाळूमामा देवालय समिती जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी, असेही ते म्‍हणाले.

भोंदूबाबाचे पितळ उघडे पाडण्यासाठी सहकार्य करावे

बाळूमामांचा भक्तगण हाच बाळूमामांचा प्रपंच बाळूमामांचा अवतार, वंशज कोणीही नाही जर कोण भासवत असेल तर ते साफ चुकीचे आहे. बाळूमामांचा भक्तगण हाच बाळूमामांचा प्रपंच आहे.

भक्तांनी बाळुमामांच्या नावावर लूट करणाऱ्या लोकांपासून सावध राहावे. कोणत्याही प्रकाराचा आर्थिक व्यवहार करू नये. जर अशा घटना घडत असतील तर आपणजवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करून माहिती द्यावी भोंदू बाबाचे पितळ उघडे पाडण्यासंदर्भात सहकार्य करावे, असेही ते म्‍हणाले.

आजपर्यंत बाळूमामा देवालयाकडून पंढरीच्या वारीसाठी दिंडी नेण्यासाठी ५ ते ६ पत्र देण्यात आलेली आहेत. त्या पैकी एक पत्र मनोहर भोसले याला देण्यात आलेले आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

यावेळी विश्वस्त गोविंद दत्तु पाटील, शिवाजी लक्ष्मण मोरे, सरपंच विजय गुरव, ग्रामपंचायत आदमापूर सदस्य प्रकाश कापरे, व्यवस्थापक अशोक पाटील व पोलीस पाटील लक्ष्मण पाटील, राजाभाऊ माळी, लक्ष्मणराव चिंगळे हे उपस्थित होते.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT