जळगाव; पुढारी वृत्तसेवा : चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदी, उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील छोटे-मोठे बंधारे, पाझर तलाव, गिरणा धरण वगळता इतर छोट्या-मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
हे पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे सद्यस्थितीत आता जामदा बधार्यावरून 1500 क्युसेक्स पाणी जात असून दुपारनंतर त्यात मोठी वाढ होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
भडगाव व पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रात 31 रोजी दुपारनंतर पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. तरी सखल नदीकाठावरील गुरेढोरे, जळतंन सामान, चारा तसेच रहिवासी यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे व सावध असावे.
ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती व महसूल प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन सर्वांना अवगत करावे, असे गिरणा पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव यांनी कळविले आहे.
आज (दि. 31) मन्याड मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 100 टक्के झालेला आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मन्याड नदीपात्रात जवळपास ५००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
त्यामुळे मन्याड व गिरणा नदीच्या काठावरील गावातील लोकांनी नदीत जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
तसेच सर्वांनी आपली काळजी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव व उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी केलेले आहे.
बोरी धरणाची पाणी पातळी 267.11 मीटर असून आज मंगळवारी सकाळी 7.30 वाजता धरणाचे 5 दरवाजे 0.15 मीटरने उघडून 2255 क्युसेक्सक विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.
रात्री पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळलेली असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे. महामार्ग विभागातर्फे वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सततच्या पावसामुळे व अवघड घाटामुळे सदर कामात अडचण येत आहे. सदर मार्गाने आपले प्रवासाचे नियोजन असल्यास ते तात्पुरते स्थगित करावे, असे सांगण्यात आले आहे.