कर्णकर्कश्श हॉर्न ची जागा घेणार भारतीय वाद्यसंगीत | पुढारी

कर्णकर्कश्श हॉर्न ची जागा घेणार भारतीय वाद्यसंगीत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वाहतूक कोंडीत वाहनचालकांनी दाबलेल्या कर्णकर्कश्श हॉर्न च्या आवाजाऐवजी सुमधुर भारतीय वाद्यांचे संगीत ऐकू येईल का?, यावर विचार करण्याच्या सूचना परिवहन मंत्रालयाला दिल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नितीन गडकरी म्हणाले की, केंद्रीय वाहतूक मंत्रालयाद्वारे हॉर्नचा कर्कश्श आवाज बदलून त्याजागी भारतीय संगीत क्षेत्रातील वाद्यांचा आवाज वापरता येईल का? याची पाहणी केली जात आहे. तसे आदेश मंत्रालयाला दिले आहेत. मंत्रालयाकडून लवकरच याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. देशात वायुप्रदूषणाचा स्तर वाढत आहे.

त्यातही अनेक जण मोठ्या आवाजाचे हॉर्न गाडीला लावतात. विनाकारण जोर-जोराने कर्णकर्कश्श हॉर्न वाजवून वाहनचालकांचे लक्ष विचलित होते. निष्काळजीपणाने हॉर्न वाजवल्याने अपघात होण्याची शक्यता देखील वाढते. पर्यायाने ध्वनिप्रदूषणदेखील वाढते. यावर या सुमधुर पर्याय कामी येईल का? याचा विचार वाहतूक मंत्रालयाकडून सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या सूचनेमध्ये भारतीय वाद्यांचे सूर हॉर्नमध्ये वापरण्यास गडकरी यांनी सांगितले आहे. हॉर्नच्या आवाजासाठी वापरण्यात येणार्‍या भारतीय वाद्यांमध्ये तबला, पेटी, तानपुरा, बासरीचे सुमधुर सूर वापरण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे लवकरच प्रवास करताना कर्णकर्कश्श आवाज ऐकू न येता सुमधुर संगीत ऐकायला मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

सध्या मुंबईतील बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या आवाजाच्या हॉर्नची सर्रासपणे विक्री केली जाते. त्यात दुचाकींना ट्रकचा, पिपाणीचा आणि इतर आवाज करणारे हॉर्न बसवले जातात. मात्र त्यास परिवहन विभागाची मंजुरी नाही. तरीही काही तरुण या हॉर्नचा नियमबाह्य पद्धतीने वापर करतात. परिणामी, शासनाने भारतीय वाद्यांच्या आवाजास मंजुरी दिली, तर त्याप्रकारे हॉर्न तत्काळ बाजारपेठांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच वेगळेपण म्हणून वाहन चालकांकडूनही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात गडकरी यांनी या अभिनव संकल्पनेचा गौप्यस्फोट केला. हॉर्नमधून भारतीय संगीत ऐकू आले तर काय हरकत आहे, असा विचार गडकरींनी बोलून दाखवला आणि वाहतूक मंत्रालय कामाला लागले. भविष्यात रस्त्याने चालताना तबला, पेटी, तनपुराचा आवाज ऐकू आला तर आश्चर्य वाटायला नको.

Back to top button