Latest

आशा भोसले जेव्हा लता यांना म्हणतात, ‘दिदी तुझे सूर कच्चे वाटतायेत’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी सिनेमा जगतात आशा भोसले यांनी आपल्‍या जादुई आवाजात एकापेक्षा एक गाणी गायली. आशा भोसले यांची सदाबहार गाणी आजही रसिकांच्‍या ओठांवर रूळतात. त्‍यांनी आतापर्यंत हिंदी आणि इतर भाषेत जवळपास १६ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. जगभरात आशाजींचे फॅन्‍स आहेत. मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, भोजपुरी, मल्‍याळम, इंग्रजी आणि रशियन भाषेतील गाण्‍यांचा समावेश आहे. आशाताईंचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या कारकीर्दीवर एक नजर टाकूया.

आशा यांनी आपल्‍या करिअरमधलं पहिलं गाणं १९४८ मध्‍ये गायलं होतं. चित्रपट होता 'चुनरिया'. आशा शास्‍त्रीय संगीतशिवाय गझल, पॉप म्‍युझिक सारखी गाणीही गायली आहेत.

आशाजींनी १९४३ मध्‍ये १० वर्षांची असताना मराठी चित्रपट 'माझा बाळ' मधील 'चला चला नव बाळा…' हे गाणं गायलं होतं.

एकापेक्षा एक गाणी

हिंदी सिनेसृष्‍टीत आपल्‍या सुरिली आवाजाने मंत्रमुग्‍ध करणार्‍या आशाजींनी 'झुमका गिरा रे', 'रात अकेली है', 'आजा आजा', 'दम मारो दम', 'दिल चीज क्या है' यासारखी सदाबहार गाणी गायली.

नव्‍वदच्‍या दशकात 'बाजीगर', 'रंगीला', 'ताल' यासारख्‍या चित्रपटांसह ए. आर. रहमान आणि अनु मलिक यांच्‍यासोबतही काम केलं.
त्‍याआधी 'तिसरी मंजिल' चित्रपटादरम्‍यान, आरडी बर्मन यांनी आशा यांच्‍याशी गाण्‍यासाठी संपर्क केला होता.

त्‍यावेळी आशा भोसले यांचं वैवाहिक जीवन संपुष्‍टात आलं होतं. आशा यांनी पंचमदासोबत अनेक गाणी गायली.

जेव्‍हा आशा लतादीदींनी म्‍हणाल्‍या… तुझे सूर कच्‍चे

आशा यांनी एका सिंगिंग रिॲलिटी शोमध्‍ये प्रमुख पाहुण्‍या म्‍हणून उपस्‍थिती लावली होती. त्‍यावेळी त्‍यांनी लतादीदींबद्‍दलच्‍या काही आठवणी शेअर केल्‍या होत्‍या.

आशाजी म्‍हणाल्‍या, 'मी आणि दीदी जेव्‍हा रेकॉर्डिंग करायला जात होतो, तेव्‍हा खूपच सिंपल कॉटनची साडी नेसून, हातात काचेच्‍या बांगड्‍या घालून जायचो. आमचं संपूर्ण लक्ष फक्‍त गाण्‍याकडे असायचं.'

यावेळी आणखी एक प्रसंग त्‍यांनी सांगितला.

आशाजी म्‍हणाल्‍या, '१० वर्षांपूर्वी माझ्‍या दीदीने एक गाणे गायले होते. त्‍यावेळी मी दीदीला म्‍हणाले की, दीदी तुझा आवाज ठीक वाटत नाहीये आणि तुझे सूर कच्‍च वाटत आहेत. त्‍यावेळी दीदी म्‍हणाल्‍या, अच्‍छा, असयं? तुला जास्‍त माहिती आहे…'

दुसर्‍या दिवशी लतादीदी सकाळी-सकाळी तानपुरा घेऊन रियाज करायला बसल्‍या. त्‍यानंतर तेच गाणं मला पुन्‍हा गाऊन दाखवलं. त्‍यांचा हा रियाज म्‍हणजे संगीताप्रती असलेलं समर्पण आहे.'

प्रत्‍येक गाणार्‍यासाठी रियाज खूपच आवश्‍यक असल्‍याचेही आशाजींनी यावेळी सांगितले हाेते.

विविध पुरस्‍कारांनी सन्‍मान

आशा यांना सर्वोत्‍कृष्‍ट फिमेल प्लेबॅक सिंगर म्‍हणून फिल्मफेअर पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे.

दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनीही गौरवण्‍यात आले आहे. त्‍यांना २००८ मध्‍ये तत्‍कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्‍या हस्‍ते 'पद्म विभूषण'ने सन्‍मानित करण्‍यात आलं होतं.

हेही वाचलं का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT