Latest

अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत कर्नाटकशी चर्चा करू : जयंत पाटील

अमृता चौगुले

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारने जो काही निर्णय घेतला आहे, त्याबाबत सविस्तर अभ्यास करण्याची सूचना जलसपंदा विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आली आहे. त्यातून जे काही निष्कर्ष निघतील, त्या अनुषंगाने कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यात येईल, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दोन दिवसांपूर्वी अलमट्टी धरणांची उंची 524 मीटरपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव असल्याचे सूतोवाच केले होते. त्याबाबत सोमवारी मुंबईत पत्रकारांनी जयंत पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी गेल्यावर्षी आणि यावर्षी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर नियंत्रित करण्याच्या कामात कर्नाटक सरकारने चांगले सहकार्य केल्याचे सांगितले.

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबतचा त्यांचा प्रस्ताव असेल तर त्याबाबत सविस्तर अभ्यास करून अहवाल देण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जे काही निष्कर्ष निघतील, त्या अनुषंगाने कर्नाटकशी योग्य ती चर्चा करण्यात येईल. याबाबतीत तातडीने आणि घाईघाईने कोणता निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही, असेही पाटील म्हणाले.

सध्या या धरणाची उंची 519 मीटर आहे. तरीही त्याच्या बॅकवॉटरमुळे सांगलीआणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे हाहाकार उडतो आहे. या धरणाची उंची 524 मीटर केली तर कृष्णा, वारणा, पंचगंगा या तीनही नद्यांच्या काठावरील शेकडो गावे आणि कोल्हापूर व सांगली शहरातील अनेक नागरी वस्त्या कायमस्वरूपी पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.

कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची वाढू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय आणि कृष्णा खोरे पाणी वाटप लवादाकडे न्याय मागावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्‍त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT