कराड; पुढारी वृत्तसेवा : कराडमधील रुक्मिणी नगर परिसरात महिलेचा शस्त्राने वार करून खून केला. शुक्रवारी (दि 24) सायंकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती समजताच डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, प्रेमप्रकरणातून हा खून झाला असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. महिलेचा शस्त्राने वार करून खून केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराडमधील एका हॉस्पिटलमध्ये एक महिला मावशी म्हणून काम करत हाेती.
इतर वेळेला टेलरिंगचा व्यवसाय करणारी महिला रुक्मिणीनगर परिसरात एकटीच राहत होती.
तिला दोन मुले असून, दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. संबंधित महिला पतीबरोबर न राहता एकटीच राहत होती.
महिलेवर शस्त्राने वार झाल्याची घटना समजताच आज (शनिवारी) सकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची त्यांच्या निदर्शनास आले.
घटनास्थळी पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती. पोलिसांनी जाबजबाब घेण्याची कार्यवाही सुरू केली असून, संशयितांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली आहेत.
दरम्यान, प्रेमप्रकरणातून हा खून झाला असल्याचा संशय व्यक्त करत पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघण्यास सुरुवात केली असून, त्याच्या आधारे घटना कशी घडली. तिकडे शनिवारी सायंकाळी कोणकोण गेले याची माहिती घेतली जात आहे.
तसेच घटनास्थळी ठसे तज्ज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी माहिती घेत संशयिताचा शोध सुरू केला आहे.