Latest

शिंदे गटात गेलेल्या विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पक्षाच्या विरोधात काम केल्याने आणि पक्षाची शिस्त मोडल्यानंतर विजय शिवतारे यांना शिवसेनेने अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत होते. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर, त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. विजय शिवतारे यांनी शिंदे गटात जात असल्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जनता, आमदार कोणीही खूश नव्हते. २९ जून रोजी शिंदे गट सरकारमधून बाहेर पडला. त्यावेळी मला वाटले की ही योग्य वेळ आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार असलेली ही खरी शिवसेना आहे. वैचारिकदृष्ट्या पाहिली तर एकनाथ शिंदे यांचा गट ही खरी शिवसेना असल्याची प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिली आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात शिंदे गटाने सुरुंग लावण्यास सुरुवात केली. संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि जिल्हा प्रमुख राजेश शहा यांच्या हकालपट्टीनंतर झालेल्या घडामोडीत पालघरचे खासदार राजेंद्र गावित आणि जिजाऊच्या निलेश सांबरे यांनीही आपल्या नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

पालघर जिल्ह्यातील शिवसैनिक थांबा आणि वाट पहा या विचारात असताना आणि ज्यांच्यावर पालघरची जबाबदारी देण्यात आली होती त्या संपर्कप्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांची हकालपट्टी केल्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचे ठरविले. शुक्रवारी सायंकाळी पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे काही प्रमुख पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये पालघर जिल्ह्यातील वसई – विरार महानगरपालिकेतील ५, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, मोखाडा नगरपंचायतीच्या १२ नगरसेवकांनी तसेच काही जिल्हा परिषद सदस्यांनी युती सरकारला आपला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT