…तर राजकारण सोडेन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

...तर राजकारण सोडेन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाइन डेस्क : निवडणुकीत एकही आमदार पडला तर राजकारण सोडेन, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे व्यक्त केले आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे.

यावेळी शिंदे म्हणाले, शिवसेनेला आणि शिवसैनिकांना वाचवण्यासाठी मी हा निर्णय घेतला. हे सर्व करण्यामागे माझा कोणताही स्वार्थ नव्हता. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे नेत आहोत. म्हणूनच 50 आमदार विश्वासाने आमच्यासोबत आले.  सुरुवातीला मी गेलो तेव्हा तर आम्ही फक्त 30 जणच होतो. मात्र नंतर एक-एक करून आमदार येत गेले. या सर्व आमदारांचा माझ्यावर विश्वास आहे. आपल्या माणसांचं ऐकलं पाहिजे म्हणून मी इथे आलो आहे. त्यामुळे एकही आमदार पडला तर मी राजकारण सोडेन, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असते

यावेळी पुढे बोलताना मुख्यंमत्री म्हणाले लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असते. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितल्यानंतर कोणतेही निर्णय घ्यायचे नसतात. मात्र घाईघाईने कॅबिनेट बोलावून अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामुळे ते बेकायदेशीर होते. म्हणून हे निर्णय रद्द करून उद्या कॅबिनेटमध्ये औरंगाबदच्या नामांतरावर शिक्का मोर्तब करणार, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

मी जिथे जातो तिथे मंत्रालय

आमचे सरकार हे लोकांचे सरकार आहे ही भावना लोकांमध्ये ही रुजायला हवी. लोकांना हा मुख्यमंत्री माझा आहे असे वाटले पाहिजे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. हा सर्व सामान्यांच्या हिताचा निर्णय आहे. मंत्रालय बंद असल्याच्या विरोधकांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. मी जिथे जातो तिथे मंत्रालय आहे. माझं काम सुरुच असतं. सकाळी 7 वाजल्यापासून पुर परिस्थितीचा आढावा घेतो. गाडीमध्ये देखिल काम सुरूच असते. त्यामुळे लोकांना चर्चा करायची ती करू द्या, असे उत्तर शिंदे यांनी दिले.

Back to top button