Latest

व्हिडिओ व्हायरल! माकडाच्या मृत्यूनंतर मुंडन अन्‌ तेराव्याला भोजन, १५०० लोकांची गर्दी

दीपक दि. भांदिगरे

भोपाळ; पुढारी ऑनलाईन

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका गावात माकडाच्या अंत्यसंस्कारानंतर आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमाला सुमारे १,५०० लोकांनी गर्दी केली. यानंतर कोविड प्रोटोकॉलचे (Covid protocols) उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील दलुपुरा गावात (Dalupura village) एक अनोखे प्राणी प्रेम पहायला मिळाले. येथील एका माकडाच्या मृत्यूनंतर गावातील लोकांना खूप दुःख झाले. या माकडाला अखेरचा निरोप देण्यासाठी अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. मंत्रोच्चार करत स्मशानभूमीपर्यंत माकडाची अंत्ययात्रा काढण्यात आली. हिंदू प्रथेनुसार हरी सिंह नावाच्या तरुणाने माकडाच्या दहाव्याला मुंडनही केले. मृत माकड हे पाळीव नव्हते. पण ते वारंवार गावात येत होते. पण थंडीमुळे त्याचा मृत्यू झाला.

माकडाच्या अंतिम संस्कारानंतर, गावकऱ्यांनी पैसे गोळा केले आणि १५०० हून अधिक लोकांसाठी त्याच्या तेराव्याला भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. गावकऱ्यांना भोजनासाठी आमंत्रित करून कार्ड छापून ते वाटण्यात आले होते. आणखी एका व्हायरल व्हिडिओ मध्ये शेकडो लोक एका मोठ्या मंडपात रांगेत बसलेले दिसत आहेत. येथे महिला आणि मुले जेवताना दिसत आहेत. पण गर्दी करुन कलम १४४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गावकऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशात कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी लागू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

मध्य प्रदेशात सोमवारी २,३१७ रुग्ण आढळून आले होते. तर एकाचा मृत्यू झाला आहे. इंदोर, भोपाळ, ग्वाल्हेर, जबलपूर आणि सागर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT