coins : पगार म्हणून दिली 227 किलोंची नाणी! | पुढारी

coins : पगार म्हणून दिली 227 किलोंची नाणी!

न्यूयॉर्क ः खिशात चिल्‍लर(coins)अधिक खुळखूळू लागली की आपण कुठे ना कुठे ती खर्च करून टाकतो किंवा त्याबदली नोटा घेतो. अशावेळी एखाद्याला पगार म्हणून तब्बल 227 किलोंची चिल्‍लरच मिळाली तर? अमेरिकेत एका मालकाने आपल्या कर्मचार्‍याला असा पगार दिला! त्यामुळे या कर्मचार्‍याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्याने मालकाविरुद्ध न्यायालयात दावा ठोकला.

अमेरिकेतील जॉर्जियामध्ये राहणार्‍या अँड्रियाज फ्लॅटन हा एक कार मेकॅनिणून काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याचे आणि त्याच्या मालकाचे कसल्याशा कारणामुळे कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अँड्रियाजने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि मालकाला आपल्या शेवटच्या पगाराचे पैसे आणि इतर भत्ते देण्यास सांगितले.

मालकाने त्याला ठरलेल्या तारखेला सर्व रक्‍कम मिळेल असे आश्‍वासन दिले. ठरलेल्या तारखेेला मालकाने अँड्रियाजला पगार दिला, मात्र चिल्‍लरच्या(coins) स्वरूपात! त्याची बाकी असलेली सर्व रक्‍कम आपण आदा करीत आहोत आणि ती घेण्यासाठी त्याने यावे असे निमंत्रण मालकाने धाडले. अँड्रियाज पैसे घ्यायला गेला आणि समोरचे चित्र पाहून तो थक्‍कच झाला

मालकाने ही सर्व रक्‍कम चिल्‍लरच्या स्वरूपात समोर ठेवली होती. सर्व नाण्यांचे एकत्रित वजन केले असता या ‘पगारा’चे वजन तब्बल 227 किलो असल्याचे दिसून आले. आपल्याला मुद्दाम त्रास देण्यासाठीच मालकाने चिल्‍लर दिल्याचे ओळखून अँड्रियाजने त्याच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे.

Back to top button