शरद पवार विधानसभा निवडणुकांच्या मैदानात, भाजपविरुद्ध दंड थोपटले - पुढारी

शरद पवार विधानसभा निवडणुकांच्या मैदानात, भाजपविरुद्ध दंड थोपटले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार उतरले असून, त्यांनी भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. तशी घोषणाच पवार यांनी मंगळवारी केली. मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गोव्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्रासारखाच महाविकास आघाडीचा प्रयोग गोव्यातही होणार असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.

उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारमधील कॅबिनेट मंत्री मौर्य यांनी राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला. भाजपचे आणखीही काही आमदार पक्ष सोडणार असल्याचे कळते. या घडामोडी पाहता, उत्तर प्रदेशमध्ये यावेळी नक्की परिवर्तन होणार
आहे, असा दावाही पवार यांनी यावेळी केला.

पुढील आठवड्यात उत्तर प्रदेशात जाणार : पवार

ते म्हणाले, मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. तेथे पाच जागा राष्ट्रवादी लढणार आहे. तर गोव्यामध्ये काँग्रेस, तृणमूल आणि इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या आठवड्यात मी स्वतः जाणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षांची आघाडी झाली आहे. लखनौमध्ये बुधवारी या सर्व पक्षांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत जागावाटपाची घोषणा करण्यात येईल.

आमच्या बाजूने 80 टक्के, तर 20 टक्के लोक बाजूचे नाहीत, असे विधान करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अल्पसंख्याक आणि इतर समाजांच्या मनामध्ये भीती निर्माण केली आहे. वास्तविक, मुख्यमंत्री हा सर्वांचा असतो. त्यांचे विधान मुख्यमंत्रिपदाला शोभा देणारे नाही, अशी टीका पवार यांनी केली. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे अल्पसंख्याक नेते सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

हेही वाचलंत का?

गोव्यात भाजपचे सरकार हटविण्याची गरज आहे. तसे एकत्रित पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे. आमचीही तशी इच्छा आहे. माझ्या पक्षाकडून प्रफुल्ल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत व काँग्रेसचे नेते अशी चर्चा सुरू आहे.
– खा. शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

Back to top button