Latest

उ. प्रदेश विधानसभा निवडणूक : स्वामी प्रसाद मौर्य यांच्‍या मुलाला ‘सपा’ने डावलले

अमृता चौगुले

लखनौ : पुढारी वृत्‍तसेवा :  उत्तर प्रदेशमधील भाजपचे बडे नेते अशी स्वामी प्रसाद मौर्य यांची ओळख हाेती. विधानसभा निवडणुकीच्‍या ताेंडावर त्‍यांनी समाजवादी पार्टीत (सपा)  केला.  मात्र आता त्‍याच स्वामी प्रसाद मौर्य यांच्‍या मुलाला विधानसभा तिकिट देण्‍यास 'सपा'ने नकार दिला आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी रायबरेलीतील उंचाहार येथून राजकारणाला सुरुवात केली. बसपाच्या राजवटीत ते मंत्री झाले. नंतर त्यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला; पण आता विधानसभा निवडणुकीपूर्वी ते अखिलेश यादव यांच्यासोबत गेले आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांचे कुटुंबही राजकारणात सक्रिय आहे.त्यांची मुलगी संघमित्रा मौर्य बदायूंमधून लोकसभा खासदार आहे. स्वामी प्रसादही त्यांचा मुलगा उत्कृष्ट मौर्य याला राजकारणात प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत.

उत्कृष्ट यांनी उंचाहर मतदारसंघातून दोनदा विधानसभा निवडणूक लढवली होती; पण थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. यावेळी भाजप सोडून 'सपा'मध्ये दाखल झालेले स्वामी प्रसाद मौर्य हे आपल्या मुलाला उंचाहारमधून तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र समाजवादी पक्षाच्या नव्या यादीत उंचाहारची उमेदवारी विद्यमान आमदार मनोज पांडे यांना देण्‍यात आली आहे.

उत्कृष्ट मौर्य यांनी 2012 ची विधानसभा निवडणूक बसपाच्या तिकिटावर लढवली होती. त्यांना 59348 मते मिळाली. मात्र समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या मनोजकुमार पांडे यांनी 61930 मते मिळवून त्यांचा पराभव केला. त्यानंतर 2017 च्या विधानसभा निवडणुकीतही हाच परिणाम दिसून आला. या निवडणुकीत मनोज पांडे विजयी झाले आणि त्यांच्या विजयाचे अंतरही 2000 च्या आसपास होते. उत्कृष्ट मौर्य यांनी बसपा सोडून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर रिंगणात उतरले होते. आता ते कोणते राजकीय पाऊल उचलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :

SCROLL FOR NEXT