Latest

बीड : सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार आशा वाघवर कोयत्याने खुनी हल्ला

अनुराधा कोरवी

केज (बीड) ; पुढारी वृत्तसेवा : केज तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून त्यांच्या सख्ख्या भावाने कोयत्याने मानेवर व डोक्यात वार केले आहेत. यानंतर जखमी नायब तहसीलदार आशा वाघ यांची प्रकृती गंभीर आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, केज येथे महसूल विभागाच्या कार्यरत नायब तहसीलदार आशा वाघ आणि त्याचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ यांचा कौटुंबिक कलह आणि शेतीच्या कारणावरून कौटुंबिक वाद सुरू होता. याच दरम्यान आज सोमवार (दि. ६) रोजी सकाळी ११:३० वा. मधुकर वाघ (वय ४५ वर्ष रा. दोनडिगर ता. चाळीसगाव जि. जळगाव) याने केज तहसिल कार्यालयातील अस्थाना विभागात काम करीत बसलेल्या आशा वाघ याच्यावर कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने आशा वाघ या घाबरल्या आणि त्यांनी जीव वाचविण्यासाठी शेजारी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात आश्रय घेतला. यानंतर तहसील कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनी हल्लेखोर भावाला थाबवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान आशा यांना अंबाजोगाई येथील दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. तर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथे हलविले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान हल्ल्याची माहीती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर -पवार यानी केज येथे येऊन माहिती घेतली. तर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पुढील मार्गदर्शन करीत आहेत.

तहसील कार्यालयात उपस्थितामुळे वाचले प्राण

नायब तहसीलदार आशा वाघ या आस्थापना विभागात काम करीत असताना त्यांच्यावर हल्ला होताच त्या जिवाच्या आकांताने ओरडल्या आणि शेजारच्या कक्षात पळत गेल्या. हे पाहताच तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी हल्लेखोर मधुकर वाघ यास धरून कोंडून ठेवले आणि पोलीसांना व तहसीलदार दुलाजी मेंडके यांना माहिती दिली.

त्यानंतर सरकारी वाहनातून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर तात्काळ प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी हल्लरखोर मधुकर वाघ यास ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT