Latest

‘ओबीसी’ आरक्षणाबाबत आघाडी सरकार वाजवतेय ‘ट्रिपल ढोलक’

अमृता चौगुले

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

'ओबीसी' आरक्षणाबाबत हे सरकार डबल, ट्रिपल ढोलकी आणि केवळ ढोलकीच वाजवत आहे. हे सरकार काहीच करत नाही. सरकारमधील सर्व नेते केवळ भाषणे करतात. दोन वर्षात राज्य सरकार 'ट्रिपल टेस्ट' का करू शकले नाही, याचे उत्तर सरकारमधील नेत्यांनी दिले पाहिजे, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिले आहे.

शुक्रवारी (दि.२०) इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा-नरसिंहपूर येथे फडणवीस यांनी आपले कुलदैवत लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीसांच्या काळात त्यांना ओबीसी आरक्षण देता आले नाही, ते डबल ढोलकी वाजवतात, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर केली होती. या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, नाना पटोले यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे. आमच्या काळात आम्ही 50 टक्क्यांपेक्षा वरचे आरक्षण होऊनदेखील टिकवले होते. हे आरक्षण ४ मार्च २०२० ला गेले आहे, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 13 डिसेंबरला नाना पटोले समर्थित उद्धव ठाकरे सरकारला न्यायालयाने 'ट्रिपल टेस्ट' करण्यास सांगितली होती, ती केली नाही. पंधरा महिने कोर्टाने वाट पाहिली, त्यानंतर ओबीसी आरक्षण रद्द केले, आरक्षण रद्द केल्यालाही एक वर्ष निघून गेले. तेव्हाही ते 'ट्रिपल टेस्ट' पूर्ण करू शकले नाहीत. मध्यप्रदेशने मात्र सहा महिन्यांत 'ट्रिपल टेस्ट' पूर्ण करून अहवाल सादर केला.

या वेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर, दौंडचे आमदार राहुल कुल, माळशिरसचे आमदार राम सातपुते, अकिंता पाटील- ठाकरे उपस्थित होते.

पवारांची भूमिका कधी कुणाला कळाली आहे का?

छत्रपती संभाजी राजांचे शरद पवारांनी समर्थन केले, यावर फडणवीस म्हणाले, पवारांची भूमिका कधी कोणाला कळली आहे का? ते काय भूमिका घेतात ते त्यांनाच माहिती असतं. त्यावर न बोललेलं बरं! छत्रपती संभाजी महाराज जर शिवसेनेतून उभे राहिले, तर भाजपची भूमिका त्यांना पाठिंबा देण्याचे राहील का? यावर छत्रपती संभाजी महाराजांना भाजपने राष्ट्रपती कोट्यातून सहा वर्षे खासदार केले. आम्ही त्यांना कधीही पक्षाचा प्रचार करा, असे म्हटले नाही. पक्षाच्या व्यासपीठावर त्यांनी आले पाहिजे असा आग्रहदेखील धरला नाही. राष्ट्रपती कोट्यातील छत्रपतींच्या घराण्यातील म्हणून त्यांचा पूर्णपणे सन्मान आम्ही केला. आता जर शरद पवार यांना असे वाटत असेल की, ते खासदार झाले पाहिजेत तर सहाव्या जागेवर का? हक्काची जागा त्यांना द्यावी. छत्रपतींच्या घरण्याप्रति केवळ आमचे कर्तव्य आहे, त्यांचे कर्तव्य नाही का? महाविकास आघाडीने व शिवसेनेला त्यांना द्यायचे असेल तर हक्काची जागा द्यावी, सहावी जागा का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित करत पाठिंब्याबाबत भारतीय जनता पक्षाचा जो काही निर्णय घ्यायचा आहे ते आमचे 'हायकमांड' घेतील असे सांगितले.

संजय राऊत ही मोठी व्यक्ती नाही-

पुण्यात भाजपने मनसेचे राज ठाकरे यांच्या सभेला अडथळा आणला, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर फडणवीस म्हणाले की, संजय राऊत ही कोणी महत्त्वाची व्यक्ती नाही, ते सकाळी वेगळे तर संध्याकाळी वेगळे बोलतात. गेले असतील तर कशाला गेले ? नाही गेले तर का गेले नाहीत ? अशा व्यक्तींना मी उत्तरे देत बसत नाही.

राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्याबद्दल त्यांच्यावर टीका होतेय, यावर त्यांनी सांगितले की, राज ठाकरे यांनी दौरा पुढे ढकलला आहे, रद्द केलेला नाही. अयोध्याला राज ठाकरे जात आहेत, त्यास भाजपचे काही खासदार विरोध करत आहेत, यावर फडणवीस म्हणाले की, केवळ राज ठाकरेच नाही जो राम भक्त जाईल त्याचे स्वागतच झाले पाहिजे. त्याला विरोध करणे चुकीचे आहे, ते जेव्हा तिथे जातील तेव्हा त्यांचे स्वागतच होईल असे फडणवीस म्हणाले.

बारामतीची तहान संपली की बाकीच्यांची तहान संपवू

उजनीचे पाणी बारामतीला नेले, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील पाणी आणले, तेही बारामतीकरांनी पळविले, बारामतीची तहान संपली की आपण इतरांची तहान संपवू अशा शब्दांत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. तुमचे उत्तरदायित्व फक्त बारामतीपुरतेच आहे का, असा सवाल उपस्थित करत गेल्या दोन वर्षांपासून उजनीत मुबलक पाणी आहे, त्याचे नियोजन व्हायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT