Latest

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणणारा पहिला वैमानिक सुमित माळवदे 

स्वालिया न. शिकलगार

महाड : श्रीकृष्ण द. बाळ

रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि भारतात एकच गोंधळ निर्माण झाला. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले असंख्य भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले. त्यांना भारतात परत आणण्याचे आव्हान भारत सरकारसमोर होते. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. भारताच्या काही जिगरबाज वैमानिकांनी हे आव्हान स्वीकारले. या वैमानिकांमध्ये एक महाडकर होता. भारतातून ज्या पहिल्या विमानाने युक्रेनच्या दिशेने झेप घेतली होती. त्या विमानाचा वैमानिक होता सुमित सुधीर माळवदे. महाड शहरातील तांबड भूवन येथे त्याचे कुटुंब रहायचे.

वैमानिकच व्हायचे हे सुमितचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. शास्त्र शाखेतून त्याने पदवी घेतली. नंतर निसर्गोपचाराचा पदविका अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला. क्लिनिक हिप्नोथेरपीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील त्याने केला आहे.  हे सर्व शिक्षण घेत असताना, आपल्याला वैमानिक व्हायचे आहे याचा विसर त्याने कधी पडू दिला नाही. जिद्दीने विमान उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण करित व्यावसायिक वैमानिक म्हणून परवाना त्याने मिळवला. २०१७ मध्ये तो एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून रुजू झाला. आतापर्यंत बावीसशे तास विमान उड्डाणाचा अनुभव सुमितच्या गाठीला आहे.

२३ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात परत आणण्याची मोहीम भारत सरकारने हाती घेतली. २६ फेब्रुवारीला एअर इंडियाच्या बोइंग ७८७ ड्रीमलायनरने युक्रेन सीमेवरील रुमानियाची राजधानी बुडापेस्टच्या दिशेने झेप घेतली. अन्य पाच वैमानिकांबरोबर या विमानाचे सुकाणू सांभाळत होता- सुमित माळवदे. सोबत होते १४ क्रु मेंबर, तीन इंजिनिअर आणि दोन सुरक्षा रक्षक.

युक्रेनमधून मिळेल त्या मार्गाने, प्रसंगी पायपीट करुन रुमानियाची राजधानी बुखारेस्ट विमानतळापर्यंत पोहोचलेल्या २४९ विद्यार्थ्यांना घेऊन २७ फेब्रुवारीला हे विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. नागरी विमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंदीया त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर हजर होते. या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चेहेऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता असे सुमित सांगतो.

सुमितचे कर्तुत्व एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. कोरोना काळात जगातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना 'वंदे भारत मिशन' राबविण्यात आले. या मिशनअंतर्गत पन्नास उड्डाणे करुन विविध देशांतून भारतीयांना परत आणण्याचे कामही सुमितने फत्ते केले आहे. याच काळात व्हेंटिलेटर्स आणि लसीचा कच्चा माल आणण्याची जबाबदारी देखील सुमितने पार पाडली आहे.

सुमितचे वडील महाड शहरातील तांबड भुवन परिसरात राहत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण बोईसर येथे झाल्याची माहिती त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली. महाडकरांनाच नव्हे तर रायगडकरांना देखील अभिमान वाटावा असेच सुमितचे कर्तुत्व आहे. आपल्या सध्याच्या असलेल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपण महाडकरांची भेट घेण्यासाठी येणार असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

मागील जवळपास एक महिन्यापासून सुरु असलेल्या युक्रेन-रशिया युद्धासंदर्भातील या घडामोडींची माहिती मिळूनदेखील व्यस्त असलेल्या सुमित माळवदे यांच्याशी संपर्क साधणे शक्य झाले नव्हते. भविष्यात यापुढेदेखील एक भारतीय नागरिक म्हणून देशाकरिता अशा अनेक प्रसंगांत सामोरे जाण्याचे प्रयत्न आपण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT