शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांची कोल्हापुरात चिरफाड करणार | पुढारी

शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांची कोल्हापुरात चिरफाड करणार

बारामती : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकरीविरोधी निर्णय घेतले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापूर येथे होणार्‍या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्याची चिरफाड करू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेट्टी यांनी यावेळी राज्य शासनावर नाराजी व्यक्त केली. हे शेतकर्‍यांचे सरकार म्हणायचे का, असा खोचक सवाल केला. ते म्हणाले, भूमी अधिग्रहण कायदा दुरुस्ती करीत महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांचा मोबदला 70 टक्क्यांनी कमी केला. एफआरपी दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय झाला.

तो बेकायदेशीर आहे. बाजार समितीतून शेतकर्‍यांच्या मतदानाचा हक्क काढून घेण्याचा मुद्दा, असे अनेक मुद्दे आहेत. शासनाने स्थापन केलेली ऊस दर नियंत्रण समिती दुबळी आहे. ती कारखानदारांसमोर काही बोलत नाही, असे अनेक प्रश्न घेऊन आमचा लढा सुरूच राहील. महाविकास आघाडी निर्माण झाली; पण शेतकर्‍यांचे प्रश्न सुटले का, असा सवाल त्यांनी
केला.

अजित पवार – शेट्टी एकत्र; बोलणे मात्र टाळले

सोमेश्वरनगर : शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आयोजित केलेल्या दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी खासदार राजू शेट्टी रविवारी बारामती तालुक्यात एकाच व्यासपीठावर आले. परंतु; त्यांनी एकमेकांशी बोलणे टाळले. निंबूत (ता. बारामती) येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आले होते. शेट्टी यांनी भाषणात दूध भेसळखोरांच्या मुसक्या सरकारने आवळल्या पाहिजेत, अशी मागणी केली. त्यावर पवार यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारने भेसळखोरांना फाशी व्हावी, असा प्रस्ताव यापूर्वीच राष्ट्रपतींकडे दिला होता. परंतु; त्यांनी त्यावर स्वाक्षरीच केली नसल्याचे सांगितले.

Back to top button