घरांबाबत अपप्रचार; सोसावा लागेल लाखोंचा भार, नाशिकमधील आमदार म्हणतात... | पुढारी

घरांबाबत अपप्रचार; सोसावा लागेल लाखोंचा भार, नाशिकमधील आमदार म्हणतात...

नाशिक : पुढारी टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांसाठी मुंबईत मोफत 300 घरे बांधणार असल्याची घोषणा विधानसभेत केल्यानंतर समाजमाध्यमांवर रोष व्यक्त केला गेला आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया समोर येताच काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचा विरोधही केला. त्यामुळे आमदारांमध्येच घरे घेण्यावरून दुमत असल्याचे समोर आल्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमदारांना घरे मोफत मिळणार नसून, त्यासाठी त्यांच्याकडून किंमत वसूल केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आमदारांच्या घरांवरून निर्माण झालेल्या  संभ्रमाचा धुरळा हा दिवसागणिक वाढूच लागल्याने, जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या जाणून घेतलेल्या या प्रतिक्रिया…

ज्या आमदारांना मुंबईत घरे नाहीत त्यांच्यासाठी ही योजना असून, त्यासाठी पैसे आकारले जाणार आहेत. ही योजना कुठेही मोफत नाही. जमिनीपासून ते बांधकामाशी संबंधित जो काही खर्च असेल तो संबंधित आमदारांकडून घेतला जाणार आहे. ज्यांची मुंबईत घरे नाहीत, अशा आमदारांची बर्‍याचदा गैरसोय होते. त्यांना ही घरे बांधून दिली जाणार आहेत. अर्थात ते मोफत नसणार.
– छगन भुजबळ, पालकमंत्री

शासनाकडून मागील वेळेस मला घर मिळणार होते. पण त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागत असल्याने ते मी घेतले नव्हते. शासकीय वगळता आता माझे मुंबईत घर नाही. शासन फुकट घर देत नाही. कर्ज काढून त्यासाठी पैसे मोजावे लागतात. यंदाही घोषणा केली असली तरी घर घ्यायचे की नाही, याचा विचार करावा लागेल. – नरहरी झिरवाळ, उपाध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र

माझे मुंबईत घर आहे. ही योजना मुंबईत घरे नसलेल्या आमदारांसाठी आहे. त्यामुळे मला घर मिळण्याचा प्रश्नच नाही. म्हाडाकडून कोणालाही मोफत घरे मिळत नसतात. त्याची किंमत द्यावी लागते. त्यामुळे मोफत घरे मिळणार, असे म्हणणे हा अपप्रचार आहे.
– दिलीप बनकर, निफाड

माझे मुंबईत घर नाही. त्यामुळे शासनाकडून विकत घर मिळत असेल तर नक्की घेणार. कारण मतदारसंघातून आलेल्या मतदारांना मुंबईत निवासाचा नेहमीच प्रश्न सतावत असतो. अशात आमदार निवास हाच त्यांच्यासमोर उत्तम पर्याय असतो. या गोरगरीब मतदारांना न्याय देण्यासाठी निवास गरजेचे आहे, असे मला वाटते. – सुहास कांदे, नांदगाव

घरे मोफत दिली जाणार नसून, विकत दिली जाणार आहेत. त्यामुळे जर विकत घर मिळत असेल तर मी नक्कीच घेणार. माझे मुंबईत सोडा नाशिकमध्येदेखील घर नाही. अशात जर मुंबईत घर मिळत असेल तर ते नक्कीच घेऊ. हप्त्यांवर घर घेण्याची सुविधा आहे.
– हिरामण खोसकर, इगतपुरी

माझे मुंबईत घर नाही. नातेवाइकांकडे आम्ही जात असतो. नाशिक हे मुंबईच्या जवळ असल्याने रात्री 10 निघाले तरी तीन तासांत परत पोहोचता येत असल्याने तेथे घराची गरज भासत नाही. भाजपने निर्णय घेतला असून, पक्षाचा कोणताही आमदार घर घेणार नाही. तसे ही शासनाने देऊ केलेली म्हाडाची घरे गोरेगावमध्ये असून, प्रवासाच्या द़ृष्टीने ती गैरसोयीची आहेत.
– सीमा हिरे, नाशिक पश्चिम

शासनाने प्राधान्यक्रम ठरवून सुरुवातीस आमदार निवास उभारले पाहिजे. जेणेकरून याचा लाभ नवीन आमदारांनादेखील होईल. त्याचप्रमाणे ज्या आमदारांकडे मुंबईत किंवा जवळील परिसरात निवासस्थानाची सुविधा नाही व त्यांचा मतदारसंघ मुंबईपासून दूर असेल अशा आमदारांना प्राधान्याने निवासस्थान दिले पाहिजे. प्राधान्यक्रम ठरवून इतर प्रश्नही सोडवले पाहिजे.
– डॉ. राहुल आहेर, चांदवड-देवळा

मी 1995 मध्ये आमदार असतानाच मला घर मिळाले आहे. त्यावेळी त्या घराचे हप्ते भरताना मी जेरीस आलो होतो. त्यामुळे आता आमदाराला घर मिळाले म्हणजे ते फुकट असते, हा समाजातील गैरसमज आहे. भाजपने घेतलेल्या निर्णयानुसार पक्षाचा एकही आमदार घर घेणार नाही.
– दिलीप बोरसे, बागलाण

आमदारांच्या घरावरून समाजात गैरसमज पसरले आहेत. आमदार निवास पाडल्याने आमदारांची गैरसोय होत आहे. मुंबईबाहेरच्या आमदारांची काम करताना अडचणींना सामना करावा लागत असून, त्यांना हॉटेलमध्ये राहावे लागते. माझे मुंबईत घर नाही. सरकार फुकट देणार नाही. भाजपचा एकही आमदार घर घेणार नाही. – प्रा. देवयानी फरांदे, नाशिक मध्य

मुंबईतून आम्ही एका दिवसात परत येत असतो. त्यामुळे आम्हाला घराची आवश्यकता नाही. या घरांपेक्षा आमदार निवासाचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे. त्यामुळे मुंबईत येणार्‍या कार्यकर्त्यांची व आमचीही सोय होईल. आमदार निवास असल्यावर घरांची गरज नाही. सरकारने याचा विचार करावा. – नितीन पवार, कळवण-सुरगाणा

माझं मुंबईत घर नाही, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या घरांच्या योजना योग्य वाटल्यास घर घेण्याबाबतचा विचार करेल. तत्पूर्वी ही योजना नेमकी काय आहे?, हे समजून घेणार आहे. सर्व बाबी योग्य वाटल्यानंतर त्याचा विचार करेल. सध्या मुंबईतील आकाशवाणी आमदार हॉस्टेलमध्ये वास्तव्यासाठी मी एक खोली घेतली आहे. – मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माइल, मालेगाव

या लोकप्रतिनिधींशी संपर्क झाला नाही…
या प्रश्नी राज्याचे कृषिमंत्री आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे, आमदार माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, राहुल ढिकले यांच्याशीदेखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे गाजत असलेल्या घरांच्या प्रश्नावर त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

Back to top button