Latest

Stock Market Closing Bell | बाजारात तेजीचा माहौल परतला, गुंतवणूकदारांना ३ लाख कोटींचा फायदा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात बदल न करण्याच्या निर्णयानंतर भारतीय शेअर बाजारात दोन दिवसांनतर तेजीचा माहौल परतला. आज गुरुवारी (दि.२) सेन्सेक्सने सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास १ टक्क्याची वाढ नोंदवली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी वाढला. त्यानंतर सेन्सेक्स ४८९ अंकांनी वाढून ६४,०८० वर बंद झाला. तर निफ्टी १४४ अंकांनी वाढून १९,१३३ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

बाजारात आज चौफेर खरेदी दिसून आली. आजच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३.१ लाख कोटींनी वाढून ३१३.३२ लाख कोटींवर पोहोचले. याआधीच्या १ नोव्हेंबरच्या सत्रात बाजार भांडवल ३१०.२२ लाख कोटी होते. बीएसई (BSE) वर सुमारे २,३१२ शेअर्स वधारले, तर १,३३५ शेअर्स घसरले आणि १४४ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.

संबंधित बातम्या 

आज मेटल, ऑटो, कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, पॉवर, ऑइल अँड गॅस, रियल्टी प्रत्येकी १ ते २ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले.

'हे' शेअर्स तेजीत

बाजारात आज जोरदार खरेदी दिसून आली. सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, सन फार्मा, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स, इन्फोसिस, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, एनटीपीसी, एसबीआय, एचसीएल टेक, टाटा स्टील, रिलायन्स, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर टेक महिंद्रा, बजाज फायनान्समध्ये किरकोळ घसरण झाली.

निफ्टीवर ब्रिटानिया इंडस्ट्रीज, हिंदाल्को इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, अपोलो हॉस्पिटल्स आणि यूपीएल हे टॉप गेनर्स होते. तर हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp), टेक महिंद्रा (Tech Mahindra), बजाज ऑटो (Bajaj Auto), एचडीएफसी लाईफ आणि ओएनजीसी हे घसरले.

अदानी पॉवरचे शेअर्स ७ टक्क्यांनी वाढले

दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वाढ झाल्याने अदानी पॉवरचे शेअर्स (Adani Power shares) आज सुमारे ७ टक्क्यांनी वाढले. हा शेअर आज ३९१ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर हा शेअर ३७७-३७८ रुपयांदरम्यान स्थिरावला. अदानी पॉवर लिमिटेडने सप्टेंबर २०२३ ला संपलेल्या तिमाहीत ८४८ टक्क्यांची वाढ नोंदवून ६,५९४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. मागील वर्षीच्या कालावधीत नफा ६९६ कोटी रुपये होता. तर महसूल ८४ टक्क्यांनी वाढून १२,९९१ कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीने मागील वर्षी याच तिमाहीत ७,०४४ कोटी रुपये महसूल मिळवला होता. (Stock Market Closing Bell)

फेड निर्णयाने बाजाराला दिलासा

फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve's decision) बुधवारी व्याजदर ५.२५ टक्के- ५.५० टक्क्यांदरम्यान कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल (Federal Reserve Chairman Jerome Powell) यांच्या या निर्णयामुळे बाजाराला दिलासा मिळाला. जेरोम पॉवेल यांनी नजीकच्या काळात व्याजदर कपातीची शक्यताही नाकारली. त्यांनी सांगितले की केंद्रीय बँक सध्या या शक्यतेबद्दल विचार करत नाही. फेडने सलग दुसऱ्या महिन्यात व्याजदर जैसे थे ठेवले आहेत.

आशियाई बाजारातील सेऊल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगमधील निर्देशांकांनी सकारात्मक कल दर्शविला. बुधवारी अमेरिकन बाजारातील निर्देशांक उच्च पातळीवर जाऊन बंद झाले.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) बुधवारी निव्वळ विक्री केली. त्यांनी एका दिवसात १,८१६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT