Latest

कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार शिवसेनेने घडवला ! बिंदू चौक, शिवाजी चौकातील पोस्टरची चर्चा

backup backup

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या, महाविकास आघाडी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस हेच कोल्हापूरचे 'उत्तर' ठरले. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव 19 हजार 307 मताधिक्याने विजयी झाल्या. या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडली ती पालकमंत्री सतेज पाटील यांनी. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीत आघाडीने आपली जागा कायम राखत प्रतिस्पर्धी भाजपला चोख 'उत्तर' दिले.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये काल निकाल लागण्यापूर्वीच जयश्री जाधव यांच्या विजयाचे पोस्टर्स लागले होते. बावड्यात त्यांच्या विजयाचे पोस्टर्स झळकले होते. आता शिवसेनेची सुद्धा विजयानंतर पोस्टर्स झळकली आहेत. कोल्हापूर शहराचा मध्यबिंदू असलेल्या बिंदू चौकात तसेच शिवाजी चौकातील शिवसेनेची पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत.

पोस्टर्सवर महाविकास आघाडीच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या शिवसेना नेते, मुंबई व ठाणे नगरसेवक, पदाधिकारी व तमाम शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार असा उल्लेख असला, तरी 'कोल्हापूरचा पहिला महिला आमदार शिवसेनेने घडवला' हा ठळक आणि मोठ्या अक्षरातील बॅनर चांगलेच लक्ष वेधून घेतो. कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. हा मतदारसंघ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला देताना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची समजूत घातली होती व सक्रीय यंत्रणा राबवण्याचा आदेश दिला होता.

महाविकास आघाडीची सर्व ताकद जयश्री जाधव यांच्यामागे उभी करत जाधव यांना कोल्हापूरच्या पहिल्या आमदार बनण्याचा बहुमान मिळवून दिला. यानिमित्ताने महाविकास आघाडीची जिल्ह्यातील ताकद आणखी भक्कम झाली आहे. विजयी उमेदवार जाधव यांना 97 हजार 332 इतकी तर पराभूत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना 78 हजार 25 इतकी मते मिळाली. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्यासह अन्य उमेदवारांचा सुपडा साफ झाला. या उमेदवारांपेक्षा 'नोटा'ला सर्वाधिक 1,796 इतकी मते मिळाली.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी मंगळवारी (दि. 12) 61.19 टक्के मतदान झाले होते.जयश्री जाधव यांनी 2015 ते 2020 या कालावधीत भाजपकडून सम्राटनगर प्रभागातून महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. शनिवारी राजाराम तलावाशेजारी असलेल्या जलसंपदा विभागाच्या गोदामात मतमोजणी झाली. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपारी दोन वाजेपर्यंत मतमोजणी संपली. मात्र दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम सुरू होत नसल्याने त्या मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिनमधील चिठ्ठ्या मोजण्यात आल्या. यानंतर दुपारी चार वाजता निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी निकाल घोषित केला.

हे ही वाचलं का ?

SCROLL FOR NEXT