कोल्हापूर : भाजपच्या तंत्राने भाजपचा पराभव

कोल्हापूर : भाजपच्या तंत्राने भाजपचा पराभव
Published on
Updated on

कोल्हापूर : चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीने अनेक नवे पायंडे पाडले. प्रचार असो की मतदारांना बाहेर काढणे असो, भाजपच्या तंत्राने भाजपला हरविण्याचा नवा पायंडा काँग्रेसने पाडला. त्याचा फायदा त्यांना आणि महाविकास आघाडीला मिळाला. त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून आघाडीअंतर्गत सर्व नेते एकत्र राहिले तर भाजपचा पराभव करता येतो हेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक एवढी गाजेल असा विचारच कोणी केला नव्हता, पण बघता बघता या निवडणुकीला कमालीचे महत्त्व आले. सगळ्या राज्यातील नेते दोन्ही बाजूंनी या निवडणुकीच्या प्रचारात उतरले आणि बघता बघता प्रचाराचे मुद्देही बदलून गेले. सुरुवातीला बिनविरोध होणार असे वाटणारी निवडणूक प्रचंड गाजली.

नवे मुद्दे प्रचारात

ही निवडणूक जानेवारीत होईल असे वाटत होते, पण नंतर ती अचानकच मार्चमध्ये जाहीर झाली. निवडणूक लांबल्यामुळे सहानुभूतीही कमी झाली होती. त्यामुळे नवे मुद्दे प्रचारात येणार हे उघड होते.

शिवसेनेच्या नाराजीवर लक्ष केंद्रित

भाजपची सारी मदार ही महाडिक गट व शिवसेनेची नाराजी यावर होती. अशा नकारात्मक वातावरणात सुरुवातीला भाजपने वाटचाल सुरू केली. रविवारी मतदान होणार असे वाटले होते, मात्र प्रत्यक्षात मंगळवार दि. 12 रोजी मतदान झाले. त्यापूर्वी 10 मार्च रोजी रामनवमी होती. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली जाणार हे चाणाक्ष काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आले त्यांनी भराभर आपल्या चाली रचण्यास सुरुवात केली.

भाजपसाठी मोठा धक्का

शिवसेना लढणार नाही हे सिद्ध झाल्यानंतर महाविकास आघाडी एकसंघ झाली. नेत्यांची मने जुळली. मातोश्रीकडून आदेश येताच सगळे कामाला लागले आणि आघाडीतील बिघाडी टळली. भाजपसाठी हा मोठा धक्का होता.

'मातोश्री'कडून बळ

काँग्रेसच्या उमेदवारासाठी मातोश्रीने दिलेले बळ सर्वात मोठे होते. शिवसेनेकडून मोठी फौज मुंबईहून पाठविण्यात आली. त्याचा अत्यंत अनुकूल परिणाम या निवडणुकीवर झाला. शिवसैनिकांना काँग्रेसच्या हाताला मतदान करण्यासाठी ही अवघड जबाबदारी या टीमने पार पाडली. येथे काँग्रेसच्या यशाची पायाभरणी झाली.

कोल्हापूरचा स्वाभिमान हाच काँग्रेसचा मुख्य मुद्दा

भाजपकडून निवडणुकीत वेगवेगळे मुद्दे समोर येणार हे स्पष्ट होते, मात्र कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरचा स्वाभिमान या एकाच मुद्द्यावर ही निवडणूक फिरती ठेवायची असा चंग काँग्रेसने बांधला होता. त्यामध्ये त्यांना यश आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन लाख मतदारांसाठी तीन लाख कार्यकर्ते येतील, अशी केलेली घोषणा लोकांना आवडली नाही. भाजपकडून सुमारे पाच हजार कार्यकर्ते आले होते. त्यांचा वेळ चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रभाव टाकण्यातच गेला. कोथरुडसह पुणे शहरातील कार्यकर्ते आगामी पुणे महापालिकेच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधण्यासाठी 28 मार्च ते 10 एप्रिल असे तळ ठोकून राहिले. मात्र, मतदानांना ते फारसे प्रभावित करू शकले नाहीत.

सतेज पाटील यांचे सूक्ष्म नियोजन

भाजपला हरवायचे असेल तर भाजपच्या तंत्रानेच हरवायला पाहिजे याचा चंग पालकमंत्री सतेज पाटील यांनी बांधला आणि त्याद़ृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. यामध्ये बूथवाईज कार्यकर्त्यांची बांधणी केली. भाजपच्या धर्तीवर यंत्रणा गतिमान केली. वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या गटांना एकत्र आणले. सर्व पक्षप्रमुखांशी सतत संपर्कात राहत त्यांना कार्यरत ठेवले. अशा प्रकारे सूक्ष्म नियोजन करून सतेज पाटील यांनी भाजपचे तंत्र पूर्णपणे अवलंबिले.

शिवसैनिकांचे काँग्रेसला मतदान

शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांना प्रचारात उतरवून आणि त्यांना विशिष्ट अशी ठिकाणे निश्चित करून देत शिवसैनिक व शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांच्या संपर्कात त्यांना ठेवले. त्याचा फायदा शिवसेनेशी संबंधित मतदारांवर व शिवसैनिकांवर झाला. थेट मातोश्रीवरून संदेश आल्याची भावना त्यांच्यात तयार झाल्याने शिवसेनेच्या नाराज मताचे काँग्रेसच्या मतदानात रूपांतर झाले.

विरोधकांना प्रभाव क्षेत्रात रोखले

कदमवाडी, भोसलेवाडी, रुईकर कॉलनी ते मध्यवर्ती बसस्थानक या परिसरात कदम, महाडिक व त्यांचे नातेवाईक असलेल्या ठिकाणी आघाडी म्हणून अधिक लक्ष केंद्रित करून त्यांना या भागात मताधिक्य मिळणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली. त्याचबरोबर सत्यजित कदम यांचे विरोधक असलेल्या राजू लाटकर यांना बळ देत तेथील मतदान काँग्रेसच्या बाजूने होईल, अशी व्यूहरचना केली त्याचाही फायदा महाविकास आघाडीला झाला.

मीडिया वॉरमध्ये काँग्रेस आक्रमक

या सगळ्या वाटचालीत मीडिया वॉर हे आणखी एक जबरदस्त हत्यार होते. त्यामध्ये तोडीला तोड उत्तर देत काँग्रेसने 'हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले.

मालोजीराजे सक्रिय

मालोजीराजे या निवडणुकीत कलामीचे सक्रिय झाले होते. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ते सतत कोल्हापुरात राहिले. आपल्या प्रभाग क्षेत्रात मालोजीराजे व मधुरिमाराजे यांनी मतदारांना काँग्रेसकडे वळविण्याची मोलाची कामगिरी केली.

भाजपचे मुद्दे त्यांच्याच अंगलट

दगडफेकीचा चित्रा वाघ यांचा आरोप भाजपवर ढकलण्याची रणनीती आखली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मुद्दे फोल ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर कडव्या हिंदुत्वाचा मुद्दा काढला. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. तसेच चंद्रकांत पाटील यांनी ईडी चौकशीचा इशारा देताच त्यावर थेट टीका न करता सोशल मीडियातून वॉर करून हा मुद्दा निवडणुकीत जिवंत ठेवला ही काँग्रेसची रणनीती त्यांना फलदायी ठरली. शक्यतो निवडणुकीत भाजप जी रणनीती आखते त्या आधारेच
त्यांना उत्तर देण्याची पुरेपूर तयारी केली.

काळम्मावाडी योजनेला विलंब भाजपच्या गळ्यात अडकविला

काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी देण्याचा मुद्दा विरोधकांनी सातत्याने लावून धरला. त्याला बगल देत सतेज पाटील यांनी शेवटच्या दिवशी कसबा बावडा येथील जाहीर सभेत 800 दिवसांहून अधिक काळ चंद्रकांत पाटील यांनी ही योजना कशी रोखून धरली याचा पाढा वाचला आणि तारीखवार पुरावे देत विरोधकांना उत्तरेही देता येणार नाही अशा टप्प्यावर हा मुद्दा खोडून काढला.

काँग्रेसकडून भाजपविरोधी वातावरण

विनाकारण वाद न घालणे यावर भर देत काँग्रेसने चंद्रकांत पाटील हे आता पुण्याचे आमदार आहेत. कोल्हापूरच्या महापूर व कोरोना काळात ते कोठे नव्हते हे लोकांच्या मनावर बिंबवले. महिलांना दिलेल्या भेटवस्तू परत करायला लावून व मोर्चे काढून व भाजपविरोधी वातावरण तयार केले. भाजप उमेदवारांकडून झालेल्या पायताणाने मारण्याची भाषा दुर्लक्षित करीत त्याला संयमाने तोंड दिले. या काँग्रेसच्या जमेच्या बाजू ठरल्या.

हिंदुत्वाच्या मुद्याला मुख्यमंत्र्यांच्या सभेने उत्तर

रामनवमी दिवशी शहरात श्री प्रभू रामचंद्र यांचे कटआऊट लागले. हे काँग्रेससाठी आव्हानात्मक होते, पण त्याचा फारसा प्रभाव टाकता आला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर कडवट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक गेली असे वाटत असतानाच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने काढलेली प्रचंड रॅली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन सभा ही कोल्हापूर उत्तरचा निकाल निश्चित करण्यास कारणीभूत ठरली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news