कोल्हापूर : सतेज पाटील यांनी जागविला कोल्हापूरचा स्वाभिमान! | पुढारी

कोल्हापूर : सतेज पाटील यांनी जागविला कोल्हापूरचा स्वाभिमान!

कोल्हापूर : सतीश सरीकर

भारतीय जनता पक्षाच्या मातब्बर नेतेमंडळींकडून आरोपांच्या तोफा डागल्या जात होत्या. त्याचवेळी पालकमंत्री सतेज पाटील हे कोल्हापूरकरांचा स्वाभिमान जागवत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांतील नेतेमंडळींशी समन्वय साधून रणनीती आखत होते. सर्वांशी संवाद साधून दिवसाला त्यात बदल केला जात होता. प्रचारापासून मतदानापर्यंतचे मायक्रो प्लॅनिंग करण्यात येत होते. प्रखर टीका झाली की, त्याला तत्काळ उत्तर द्यायचे; अन्यथा विकासकामांवर बोलायचे, हे सूत्र अवलंबत होते. अशाप्रकारे पालकमंत्री पाटील यांच्याकडून होत गेलेली व्यूहरचना अखेर विजयानंतर यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत त्रांगडे निर्माण झाले होते. परंतु, त्यात पालकमंत्री पाटील यांनी यशस्वी शिष्टाई केली. तेवढ्यावरच न थांबता कोल्हापुरातील सर्व शिवसैनिकांना सन्मानाने प्रत्येक निर्णयात सहभागी करून घेतले. दररोज शिवसेना व राष्ट्रवादीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतले जात होते. कोणत्या भागात काय स्थिती आहे, याचा अंदाज घेऊन आडाखे तयार केले जात होते. भाजप कुठे वरचढ ठरू शकते, याची चाचपणी करून त्यावर डावपेच आखून त्याची काटेकोर अंमलबाजवणीही करण्यात येत होती. कोणतीही खासगी एजन्सी नाही, फक्त स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांकडूनच सर्व गणिते ठरविली जात होती.

भाजपच्या नेतेमंडळींनी पालकमंत्री पाटील यांच्यावर प्रत्येक सभेत सडकून टीका केली. पालकमंत्री पाटील यांच्याकडून टीका करण्यापेक्षा विकासात्मक बाबींवर बोलण्यावर भर दिला जात होता. अगदी वैयक्तिक पातळीवर टीका झाल्यानंतर पाटील यांनी त्याला तेवढ्याच तत्परतेने आणि शांततेत सडेतोड उत्तरे दिली. कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने भाजपकडून नाराज शिवसैनिकांचे मतदान मिळविण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला जात होता. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेत आणि पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ठळकपणे छायाचित्र वापरण्यात आले.

अशाप्रकारे नाराज शिवसैनिकांनाही महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा प्रयत्न केला. सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी पालकमंत्री पाटील यांची मोठी कसरत होत होती. परंतु, ती जबाबदारी पार पाडत त्यांनी सर्व प्लॅनिंग यशस्वी केले.

‘अण्णांच्या माघारी…’ अशी बनली टॅगलाईन

लोकसभा निवडणुकीत ‘आमचं ठरलंय’ ही टॅगलाईन खूप गाजली होती. त्याच धर्तीवर यंदा पोटनिवडणुकीत ‘अण्णांच्या माघारी… आता आपली जबाबदारी…’ ही टॅगलाईन करण्यात आली होती. त्यावर गाणेही तयार केले होते. ही टॅगलाईन खूप गाजली. त्यासाठी विशेष असे कष्ट घेतले नव्हते; तर दिवसभराच्या प्लॅनिंगसाठी रोज ठराविक कार्यकर्ते एकत्र येत होते. त्यावेळी चर्चा होत होती. रोजच्या चर्चेतून ते शब्द पुढे आले आणि टॅगलाईन बनल्याचे सांगण्यात आले. त्याबरोबरच सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर करण्यात आला. मतदानाच्या अगोदर दोन-चार दिवस कै. आ. चंद्रकांत जाधव यांच्या भावनिक संवेदनशील फोटो व कोरोना कालावधीतील शहरवासीयांना आवाहन केलेले व्हिडीओ तसेच जयश्री जाधव यांचे विकासाच्या विषयावरील मुद्दे व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्यात आले.

Back to top button