कोल्हापूर; चंद्रशेखर माताडे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकीत दोन जागा जिंकून महाविकास आघाडीने आपले स्थान दाखविले आहे. मात्र कोल्हापूरच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. कोणत्याही पोटनिवडणुकीत राबत नाही एवढी यंत्रणा कोल्हापुरात दोन्ही बाजूकडून राबत होती.
काँग्रेसचे आ. चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने झालेल्या या पोटनिवडणुकीला भावनेची किनार होती. मात्र या निमित्ताने महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अंतर्गत मतभेद टाळून ज्याप्रमाणे एकत्र आले ते पाहता महविकास आघाडीच्या विजयाचा हा 'कोल्हापूर पॅटर्न' राज्यभर राबविला जाणार हे नक्की. काँग्रेसचे नेते व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात हा सामना होता. सतेज पाटील हे स्वत:च्या बळावर लढत होते; तर चंद्रकांत पाटील यांची मदार ही महाडिक गटाच्या ताकदीवर होती. त्यामुळे कोल्हापूर उत्तरचा निकाल अजिबात अनपेक्षित नाही.
निवडणूक ही स्वबळावर लढायची असते, याचा धडा कोल्हापूरने पुन्हा नेत्यांना दिला. कोल्हापूर मनपात 'महाविकास' ज्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी शिवसेना व भाजपविरुद्ध राज्यभर लढत होती तेव्हा कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी महाविकास आघाडी अस्तित्वात होती. त्यामुळे महाविकास आघाडीचा पॅटर्न कोल्हापुरात पूर्वीपासून अस्तित्वात होता. या आघाडीनेच भाजपला कोल्हापुरात आपली ताकद दाखवली.
जयश्री जाधव यांच्या विजयाने महाविकासचा आत्मविश्वास वाढला महाविकास आघाडीअंतर्गत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी ही जागा मोठ्या फरकाने जिंकली. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या तीन पोटनविडणुकीत दोन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत; तर एक जागा भाजपने महाविकास आघाडीकडून हिसकावली आहे. पंढरपूरला राष्ट्रवादीचे भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पहिल्या पोटनिवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव करून ही जागा जिंकली. त्यामुळे महाविकास आघाडीला हादरा बसला. उमेदवार निवडीपासून ते घडलेल्या प्रत्येक गोष्टीपर्यंत चर्चा झाली. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. ही जागा काँग्रेसची होती. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यात विजय मिळविण्याचा चंग भाजपने बांधला तरी त्यांच्याकडे उमेदवार नव्हता.
तेव्हा शिवसेनेचे माजी आ. सुभाष साबणे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र अशोक चव्हाण यांनी राबविलेली रणनीती व महाविकास आघाडी म्हणून राबलेले तीनही पक्ष यांनी काँग्रेसची जागा कायम राखली. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला. ताकद लावली तरी भाजपचा पराभवच त्यापाठोपाठ कोल्हापुरात चंद्रकांत जाधव या काँग्रेस आमदारांचे अकाली निधन झाले. त्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडे तगडा उमेदवार नव्हता. त्यामुळे 2014 साली ज्यांनी भाजपविरुद्ध काँग्रेसकडून निवडणूक लढविली त्या सत्यजित कदम यांना भाजपने उमेदवारी दिली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा हा जिल्हा असल्याने भाजपची राज्यातील आणि केंद्रातील सगळी ताकद भाजपच्या मागे उभी होती. निवडणूक जिंकण्याची कोणतीही कसर भाजपने सोडली नाही. तरी भाजपचा पराभव झाला. 'सतेज' नेतृत्व काँग्रेसचा उमेदवार असला तरी महाविकास आघाडीचे नेते एकसंध राहिले.
सतेज पाटील यांचे नेतृत्व पुन्हा एकदा 'सतेज'पणे उजळून निघाले. सगळी सूत्रे त्यांनी ज्याप्रकारे राबविली ती पाहता महाविकासच्या विजयाचा हा कोल्हापुरी पॅटर्न आता राज्यभर राबविला जाण्याची चिन्हे आहेत.
ज्या पक्षाचा आमदार, त्याच पक्षाला जागा
ज्यावेळी महाविकास आघाडी सत्तेवर आली तेव्हा आघाडीतील एखाद्या पक्षाची जागा कोणत्याही कारणाने रिक्त झाली तर त्याठिकाणी मूळ ज्या पक्षाचा उमेदवार आहे, त्याच पक्षाकडे ती जागा ठेवायची व आघाडीतील इतर पक्षांनी त्या उमेदवाराचा ताकदीने प्रचार करायचा, असे ठरले होते. त्यामुळे कोल्हापुरात चंद्रकांत जाधव या काँग्रेस उमेदवाराच्या अकाली निधनानंतर काँग्रेसलाच ही जागा दिली जाणार हे स्पष्टच होते. पण माजी आ.राजेश क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला. पण, मुख्यमंत्री उद्धच ठाकरे यांच्या आदेशानुसार ते कामाला लागले.
हे ही वाचलं का ?