पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाच्या फौजांनी युक्रेनमधील (Russian invasion of Ukraine) झापोरिझाजीया हा अण्विक वीजनिर्मिती प्रकल्प ताब्यात घेतला आहे. आज पहाटे या अण्विक प्रकल्पाला आग लागली होती. हा प्रकल्प युरोपमधील सर्वांत मोठा अण्विक प्रकल्प आहे. युक्रेनच्या प्रशासनाने ही माहिती दिलेली आहे. "आमची टीम या प्रकल्पातील विविध विभागांची पाहाणी करत आहे," असे त्यांनी म्हटलेले आहे.
रशियाने केलेल्या बाँब हल्ल्यात आज पहाटे २च्या वेळी या अण्विक प्रकल्पात आग लागली. जर या प्रकल्पातून किरणोत्सर्ग सुरू झाला तर चेर्नोबिलपेक्षाही १० पट मोठे संकट ओढवू शकेल असा इशारा युक्रेनने सकाळीच दिलेला आहे. तसचे या हल्ल्यामुळे रशिया अण्विक संसाधनांबद्दल किती बेफिकीर आहे, हे दिसून येते अशी टीकाही युक्रेनने केली होती. (Russian invasion of Ukraine)
सुदैवाने ही आग नियंत्रणात आणता आली, तसेच अजून तरी या परिसरात किरणोत्सर्ग झाल्याचे दिसून आलेले नाही. या अण्विक केद्रांतील आगीनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलनेस्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चाही केली आहे. रशियाने या भागातील संघर्ष थांबवावा आणि आग विझवण्यास सहकार्य करावे असे आवाहनही कऱण्यात आले होते.