Latest

राज्यपालांनी सांगितलेलं योग्यच : देवेंद्र फडणवीस

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरे सरकारने विधान परिषदेसाठी शिफारस केलेली बारा सदस्यांची यादीवर मी दुसऱ्याच दिवशी सही करणार होतो. पण पत्रातून अशी दमबाजी केल्याने हा निर्णय टाळला, असे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले. यानंतर ठाकरे गटाकडून कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांनी सांगितलेलं योग्य आहे. त्यांना उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं होत. राज्यपालांनी त्यांना योग्य फॉरमॅटमध्ये पत्र पाठवण्यास सांगितलं होतं, पण त्यांना अहंकार होता की, ते आम्ही बदलणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. पुणे येथे माध्यमांशी ते बोलत होते.

यावेळी फडणवीस म्हणाले की, माझ्या माहितीनुसार तिन्ही पक्षाचे नेते राज्यपालांना भेटायला गेले होते. तेव्हा राज्यपालांनी त्यांना सांगितलं होत की, धमकीच्या पत्रावर कधी राज्यपाल सही करत नाहीत. योग्य फॉमॅटमध्ये पत्र पाठवा. पण त्यांचा अहंकार होता, त्यांनी सांगितले की ते आम्ही बदलणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

राजकारणात कधी माणूस वर जातो, कधी खाली येतो. पण इतकं निराश होऊन मनात येईल ते बोलायचं, त्यांच्या बोलण्याने काही परिणाम होत नाही, अशी टीका फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली. उद्धव ठाकरेंची लिमिटेड डिक्शनरी आहे. त्यांचे १५-२० शब्द आहेत, त्यातील शब्द ते फिरवून वापरतात. त्यांच्या आरोपांवर उत्तर देण्यात काही अर्थ नाही, असा टोला फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला.

माजी राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले?

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे सरकारने विधान परिषदेसाठी शिफारस केलेली बारा सदस्यांची यादी शेवटपर्यंत रोखून धरली. त्या मुद्दयावरही कोश्यारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मला १२ नावांची शिफारस करताना उद्धव ठाकरे यांनी पाच पानांचे पत्र लिहिले. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. पण पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत कायदे सांगता. १५ दिवसांत यादी मंजूर करा अशी मुदत टाकता. राज्यपालांवर असा दबाव टाकता येत नाही. संविधानात अमुक एक दिवसात यादी मंजूर करा, असे कुठेही लिहिलेले नाही. कधीतरी ते पत्र समोर आल्यानंतर सत्य सर्वांसमोर येईल. मी दुसऱ्याच दिवशी सही करणार होतो. पण पत्रातून अशी दमबाजी केल्याने हा निर्णय टाळला, असे कोश्यारी यांनी स्पष्ट केले. अशा पत्राऐवजी उद्धव ठाकरे यांनी शिष्टाचार पाळून पाच ओळीत नावासह पत्र द्यायला हवे होते, असेही त्यांनी सुनावले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT