Maharashtra political crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : राजकारणात राज्यपालांचा हस्तक्षेप दुर्दैवी, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद | पुढारी

Maharashtra political crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : राजकारणात राज्यपालांचा हस्तक्षेप दुर्दैवी, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षावर आज मंगळवारपासून (दि.२१) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठासमोर गेल्या आठवड्यातही या खटल्याच्या अनुषंगाने मॅरेथॉन सुनावणी झाली होती. सत्ता संघर्षाच्या खटल्याला अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरण लागू होते का, याची पडताळणी करण्यासह मूळ खटल्याची सुनावणी पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ करणार आहे. (Maharashtra political crisis) दरम्यान, आजच्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. आधी सदस्यांच्या अपात्रेबाबत निर्णय व्हावा, असे सिब्बल यांनी म्हटले. त्यांनी यावेळी राज्यपालांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

पहाटेच्या वेळी राज्यपालानी कोणाचातरी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा केला. राज्यपालांनी त्यांच्या घटनात्मक जबाबदारीच्या पलीकडे काम केले आहे. देशाच्या राजकारणात राज्यपालांचा सक्रिय हस्तक्षेप आहे, हे दुर्दैवी असल्याचे मत सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान व्यक्त केले.

बहुमत आहे की नाही हे माहीत नसताना राज्यपाल सकाळच्या वेळी एखाद्याला शपथ कशी घेऊ देऊ शकतात? असा सवालही त्यांनी केला.

सत्ता संघर्षाचा खटला सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपविण्याची ठाकरे गटाची विनंती गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे राहील, असा निवाडा नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला होता. या निर्णयाला आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या दुपारी ३.३३ वाजता त्यावर सुनावणी होणार आहे.

राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच होत असून सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हा खटला वर्ग केला जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी स्पष्ट केले होते. ठाकरे गटासाठी हा धक्का होता.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या खटल्यात अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरण अग्रक्रमाने पुढे आलेले आहे. नबाम रेबिया प्रकरणाचा आधार घेत सत्ता संघर्षाच्या खटल्याचा निकाल द्यावा, अशी विनंती शिंदे गटाने केलेली आहे तर रेबिया प्रकरण महाराष्ट्राच्या प्रकरणाशी लागू होत नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. २०१६ सालच्या नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी हा खटला सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे तूर्त सोपविण्याची गरज नसल्याचेही सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने सांगितले आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या घटना पीठासमोर सध्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. नबाम रेबिया प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठविले जाणार नाही तर मुख्य खटल्यावरच न्यायालयाने लक्ष केंद्रित करणार आहे.

रेबिया प्रकरणाचा महाराष्ट्राच्या खटल्याचा कशा प्रकारे प्रभाव पडत आहे, यावर आम्ही प्रथम विचार करु. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे चंद्रचूड यांनी याआधीच्या सुनावणीदरम्यान सांगितले होते.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक पानी निकालाचे वाचन करताना नबाम रेबिया प्रकरणाच्या गुणवत्तेवर चर्चा केली. नबाम रेबिया प्रकरणावरील निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, म्हणून हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे पाठविण्याची मागणी संयुक्तिक नाही. आम्ही गुणवत्तेवर या प्रकरणाची सुनावणी घेऊ. त्यानंतर अंतिम निर्णय द्यायचा की मोठ्या घटनापीठाकडे पाठवायचे ते ठरवू, असे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, सत्ता संघर्षाची सुनावणी ज्या गतीने सुरु आहे, ते पाहता येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता कायदे क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. (Maharashtra political crisis)

हे ही वाचा :

Back to top button