मविआ तुमच्या पाठीशी; उद्धव ठाकरेंना शरद पवारांचा दिलासा | पुढारी

मविआ तुमच्या पाठीशी; उद्धव ठाकरेंना शरद पवारांचा दिलासा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा करून महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा दिलासा दिला आहे.

राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. धनुष्यबाण आणि शिवसेना गेल्यानंतर ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. मात्र, यापूर्वीच शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करण्याचा सल्ला दिला होता. आज ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या पार्श्वभूमीवर पवारांनी ठाकरेंशी चर्चा केली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर उभय नेत्यांत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. आगामी कायदेशीर लढ्यासंदर्भातही पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची वदंता आहे. महाविकास आघाडी तुमच्या पाठीमागे पूर्णपणे उभी आहे, असा दिलासा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

Back to top button