Latest

राज्यसभा निवडणूक : आघाडीत बिघाडी या भाजपने पसरवलेल्या बातम्या : संजय राऊत

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आघाडीत बिघाडी या भाजपने पसरवलेल्या बातम्या आहेत. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकांवरून महाराष्ट्रात मोठे राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रात या निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना संजय राऊत म्हणाले, की पहिल्या फेरीतच आमचे चारही आमदार जिंकतील. या विजयाने भारतीय जनता पक्षाला धक्का बसेल.

ते पुढे असेही म्हणाले, निवडणुकीत चुरस आहे हा भ्रम आहे, आघाडीत बिघाडी या भाजपने पसरवलेल्या बातम्या आहेत. आजही  आघाडीत समन्वय आहे,  कोणतेही मतभेद नाहीत. आजच माझी  शरद पवारांशी माझी चर्चा झाली.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदानावरुन माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांनाही मतदान करण्याचा पुर्ण अधिकार आहे.

राज्यसभेच्या जागांसाठी शुक्रवारी पंधरा राज्यांमध्ये मतदान होणार आहे. 57 पैकी 41 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आलेले असल्याने उर्वरित 16 जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये घमासान राहणार आहे. मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी निकाल जाहीर केला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
ज्या ५७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान कार्यक्रम जाहीर केला होता, त्यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ११, तामिळनाडू व महाराष्ट्रातील प्रत्येकी ६, बिहारमधील ५, कर्नाटक, आंध्र प्रदेश व राजस्थानमधील प्रत्येकी ४, मध्य प्रदेश आणि ओडिशामधील प्रत्येकी ३, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि हरियाणा या राज्यांतील प्रत्येकी २ तर उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश होता.
महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये जागांपेक्षा उमेदवार जास्त असल्याने येथील लढती लक्षवेधक होणार आहेत. वरील चारही राज्यात घोडेबाजारी झाली तर त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT