राज्यसभा निवडणूक : मतदानाला सुरुवात, एमआयएमचा महाविकास आघाडीला पाठिंबा

राज्यसभा निवडणूक : मतदानाला सुरुवात, एमआयएमचा महाविकास आघाडीला पाठिंबा

मुंबई; पुढारी ऑनलाईन

सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार प्रमुख नेत्यांसह विधानभवनात पोहचले. भाजपचे आमदार दोन बसेसमधून विधानभवनात दाखल झाले. भाजपचे तीनही उमेदवार पहिल्या फेरीत विजयी होतील असा दावा भाजपचे आमदार अतूल भातकळकर यांनी केला आहे. मॅन ऑफ द मॅच फडणवीस असतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होण्याआधी शिवसेनेच्या आमदारांना विधानभवनाच्या पक्ष कार्यालयात बोलवण्यात आले होते. एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

मतदानानंतर लगेच तासाभरात मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल घोषित केला जाईल. या निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीचे संजय पवार (शिवसेना) आणि भारतीय जनता पक्षाचे धनंजय महाडिक या कोल्हापूरच्या दोन उमेदवारांत लढत होत आहे.

२४ वर्षांनंतर राज्यसभेसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून आघाडीसमोर आव्हान निर्माण केले आहे. हे आव्हान परतवून लावण्यासाठी महाविकास आघाडीने सज्जता ठेवली आहे. आघाडीचे आणि आघाडीला साथ देणारे आमदार भाजपच्या गळाला लागू नयेत म्हणून आघाडीने आपल्या आमदारांची पंचतारांकित बडदास्त ठेवली होती. भाजपच्या आमदारांना आलिशान ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या सर्व आमदारांना मतदानापूर्वी विधान भवनात खास बसने आणण्यात आले.

सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडी आणि भाजपकडे पुरेशी मते नाहीत. त्यामुळे दोघांची मदार छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर आहे. या निवडणुकीत अपक्षांची मते निर्णायक ठरणार असल्याने त्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ठाकरे हे अपक्ष आमदारांच्या तर पवार छोट्या पक्षांच्या संपर्कात आहेत. भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले आहेत. दोन्ही बाजूंकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे.

वैध मतांवर ठरणार कोटा राज्यसभेच्या सहा जागांसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदानासाठी पात्र आहेत. पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदान होऊन वैध मतांवर विजयी उमेदवाराचा कोटा निश्चित होईल.

मतदारांना पहिल्या पसंतीचे मत देणे बंधनकारक आहे. पहिल्या पसंतीचे मत नसेल तर मतपत्रिका अवैध ठरेल. पहिल्या पसंतीनंतर मतदाराला दुसर्‍या, तिसर्‍या पसंतीची मते देता येतील. पसंतीच्या मतांवर सहाव्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार असल्याने आमदारांना मतदानाची तांत्रिक प्रक्रिया समजावून दिली जात आहे.

राज्यसभेसाठी खुले मतदान आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या आमदारांना मतदान करण्यापूर्वी आपली मतपत्रिका पक्षाने नेमून दिलेल्या प्रतिनिधीला दाखवावी लागेल. अपक्ष आमदारांना मतपत्रिका दाखवणे बंधनकारक नाही. विधानसभेतील निम्म्याहून अधिक सदस्य राज्यसभेसाठी पहिल्यांदा मतदान करणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news