नाशिक : सराफ बाजारात यंदाही पाणी तुंबणार? नालेसफाईकडे कानाडोळा, मनसे आक्रमक | पुढारी

नाशिक : सराफ बाजारात यंदाही पाणी तुंबणार? नालेसफाईकडे कानाडोळा, मनसे आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दर पावसाळ्यात सराफ बाजार, दहीपूल, शुक्ल गल्ली या भागामध्ये पाणी तुंबण्याचा नाशिककरांना अनुभव येतो. धो-धो पाऊस झाला की, हा परिसर अक्षरश: पाण्याखाली असतो. पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याने, ही स्थिती बघावयास मिळते. यंदाही मनपा प्रशासनाने या भागातील पावसाळापूर्व सफाईकडे कानाडोळा केल्याने, हा भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेने प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, वेळीच कामे करा अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.

मनसेचे शहर समन्वयक सचिन भोसले यांनी सांगितले की, अधिकार्‍यांना वारंवार फोन केल्यानंतरही ‘बघूया, करूया’ अशा प्रकारची उत्तरे दिली जातात. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांत ही कामे मार्गी न लागल्यास मनसे रस्त्यावर उतरणार आहे. दरम्यान मेनरोड, सराफ बाजार, दहीपूल, भद्रकाली हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असून, या भागांमधील अनेक अरुंद रस्ते असल्याने येथे पावसाळी गटार योजनेसाठी अत्यल्प जागा मिळालेली आहे. त्या ठिकाणी बाजारपेठ असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचतो.

हा कचरा बर्‍याच वेळा पावसाच्या पाण्याचा निचरा करणार्‍या ड्रेनेजमध्ये अडकून पाणी तुंबते. खास करून ड्रेनेजवरील ढाप्यामध्ये कचरा अडकल्यामुळे पाणी वाट मिळेल त्या पद्धतीने वाहते. त्याचप्रमाणे या भागात पूर्वीचा सरस्वती नाला वाहत असल्यामुळे त्या माध्यमांमधूनदेखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जमा होते.
त्यामुळे सराफ बाजार, शुक्ल गल्ली, भद्रकाली, दहीपूल या परिसरामध्ये गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होते. त्यानंतर मात्र नुकसानीची पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधींची रीघ लागते. यावेळी लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. व्यावसायिकांना आश्वासने दिली जातात.

मात्र, प्रत्यक्षात हे सर्व क्षणभंगुर असून, परिस्थिती ‘जैसे थे’च असते. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रशासनासह लोकप्रतिनिधींबद्दल तीव— नाराजी असून, यंदाही अधिकार्‍यांकडे तक्रारी करूनदेखील नालेसफाई होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात आता मनसेने उडी घेतली असून, पुढच्या दोन दिवसांत प्रत्येक ड्रेनेजची साफसफाई करावी, साचलेला कचरा हटवावा, बांधकाम साहित्यांचा मलबा उचलावा आदी कामे उरकून घ्यावीत, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन केले जाईल.

सराफ बाजार, शुक्ल गल्ली, दहीपूल या भागात दरवर्षी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचून बाजारपेठेचे नुकसान होते. तसेच स्थानिक नागरिकांनाही मनस्तापाचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेत महापालिकेने तत्काळ नालेसफाई करावी अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन केले जाईल व जबाबदारी महापालिकेची असेल.
– सचिन भोसले, शहर समन्वयक, मनसे

हेही वाचा :

Back to top button