Latest

पीक कर्ज व्याजमाफीस टाळाटाळ, ६ टक्के व्याज न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष

backup backup

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र व राज्य सरकारने सहा टक्के व्याज देण्याचे जाहीर केले होते, परंतु सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भरलेल्या पीक कर्जाचे व्याज अजूनही जमा झालेले नाही. आता मार्च महिन्याच्या परतफेडीतही केंद्र, राज्याचे हे सहा टक्के व्याज शेतकऱ्यांना सध्या बँकेत भरावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज या योजनेस यामुळे हरताळ फासला गेला आहे.

मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत आल्याने शेतकरी पीक कर्ज शून्य टक्के व्याज योजनेचा फायदा घेण्यासाठी जिल्हा बँकेत गर्दी करीत आहेत. शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या वतीने पीक कर्जपुरवठा केला जातो. पूर्वी हा कर्जपुरवठा वर्षातून एकदाच केला जायचा. परंतु, सध्या रब्बी व खरीप अशा दोन हंगामांसाठी स्वतंत्र कर्जपुरवठा केला जातो.

त्याची पहिली परतेड मार्च महिन्यात करावी लागते व दुसरी सप्टेंबरमध्ये करावी लागते, कर्ज भरत असताना तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर केंद्र सरकारकडून तीन टक्के व राज्य सरकारकडून तीन टक्के, असे सहा टक्के व्याज जमा केले जाते. पुणे जिल्हा सहकारी बँकेने तर तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ११ टक्के सूट दिल्यामुळे एकंदरीत पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळत असते.

व्याजाची रक्कम जमा होण्यासाठी प्रतीक्षाच

केंद्र व राज्य सरकार यापूर्वी ६ टक्के व्याजाची रक्कम ही जिल्हा बँकेच्या खात्यावर जमा करायचे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याज भरावे लागत नव्हते. शेतकरी मुद्दल भरायचे; परंतु सप्टेंबर, ऑक्टोबरपासून केंद्र व राज्य सरकारने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे ठरविल्याने शेतकऱ्यांनी कर्ज आणि व्याज भरले, परंतु ती व्याजाची रक्कम अजूनही जमा झालेली नाही. पुन्हा मार्चचा कर्ज भरणाही सुरू झाला असून, पुन्हा ६ टक्के व्याज शेतकऱ्यांना भरावे लागत आहे.

  • शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र, राज्याचे ६ टक्के व्याज जमा झाले नसल्याने व्याजमाफी मिळाली नाही. ३१ मार्चपर्यंत कर्ज व व्याज भरले नाही, तर १ एप्रिलपासून १२ टक्के दराने शेतकऱ्यांना कर्ज व त्यावर व्याज भरावे लागणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे.
  • केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या कर्जावरील व्याजमाफीची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. येथून पुढे शेतकऱ्यांना व्याज भरायला लावण्याऐवजी पूर्वीप्रमाणे जिल्हा बँकेच्या खात्यावर शेतकऱ्यांची व्याजाची रक्कम जमा करावी, अशी मागणी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळंज यांनी केली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT