चीनमधील प्रसिद्ध महिला टेनिसपटू पेंग शुआई हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.या पोस्टच्या माध्यमातून शुआई हिने चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे नेते आणि ७५ वर्षीय माजी उपपंतप्रधानांवर लैंगिक शोषणाचा ( Sexual Assault ) आरोप केला. केवळ अर्धा तासामध्ये तिने ही पोस्ट डिलिट केली. मात्र तोपर्यंत हजारो लोकांनी ती 'री पोस्ट' केल्याने हे वृत्त देशभर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.
चीनमधील एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पेंग शुआई हिने चीनमधील प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'वेईबो'वर ही पोस्ट केली. पोस्टमध्ये तिने म्हटलं होते की, चीनचे माजी उपपंतप्रधान झांग गाओली यांनी माझे लैंगिक शोषण ( Sexual Assault ) केले. ही घटना तीन वर्षांपूवी घडली. मात्र ही घटना सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचेही तिने म्हटलं आहे. या आरोपानंतर चीनमधील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. चीनमध्ये इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर पेंग शुआई हिचे नाव सर्च करणे सुरु झाले. दरम्यान,माझ्याविरोधातील सर्व आरोप निराधार असल्याचा दावा झांग यांनी केला आहे.
पेंग शुआई हिने केलेल्या आरोपांवर खुलासा करण्यास चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने नकार दिला आहे. तसेच या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नाही, असेही स्पष्ट केले आहे. चीनमध्ये मागील तीन वर्षांपूर्वी 'मी टू' (लैंगिक शोषणांच्या घटनांबाबत बोलणे) चळवळ सुरु झाली. यानंतर येथील महिलांनी लैंगिक शोषणाविरोधातील तक्रारी देण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. पेंग शुआई हिच्या आरोपानंतर चीनमध्ये लैंगिक शोषण मुद्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. तिने आरोपाची पोस्ट डिलिट केल्याने अनेकांनी यावरही सवाल केले आहेत.