Latest

नूपुर शर्मा प्रकरण : भारतासाठी आखाती देश का महत्त्वाचे आहेत?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

महंमद पैगंबर यांच्यावर टीकाटिप्पणीमुळे निर्माण झालेल्या वादात आता इस्लामिक देशांची संघटना असलेल्या Organization of Islamic Cooperationने उडी घेतली आहे. ५७ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेने ही घटना भारतात इस्लाम धर्माविरोधात वाढता द्वेश आणि मुस्लिमांना होत असलेला विरोध या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे म्हणत टीका केली आहे. या संघटनेने संयुक्त राष्ट्रांकडेही निवेदन दिले आहे.

तर भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने ही टीका अनावश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच या संघटनेची भूमिका संकुचित असल्याचे म्हटले आहे. भारत सर्वच धर्मांचा सन्मान करते, असेही भारताने म्हटले आहे.

भाजपने नूपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांना या मुद्यावरून पदावरून हटवले आहे. नूपुर शर्मा यांनी केलेल्या टीकेमुळे भारताचे सौदी अरेबिया, इराण, कुवैत, कतार अशा राष्ट्रांशी संबंध ताणले गेले आहेत. या आखाती देशांनी त्यांच्या देशातील भारतीय दूतांना बोलावून त्यांच्याकडे निषेधाचे पत्र सोपवले आहे.

गेल्या महिन्यात ज्ञानवापी मशिद प्रकरणात एक टीव्ही चॅनलवर आयोजित कार्यक्रमात नूपुर शर्मा यांनी हे वादग्रस्त विधान केले होते.
या प्रकरणात पक्षाची बाजू स्पष्ट करताना भाजपने आपला पक्ष सर्व धर्मांचा सन्मान करते, असा खुलासा केला आहे.

आखाती देश आणि भारत

बीबीसीने दिलेल्या बातमीत गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलमधील कुवैत, कतर, सौदी अरेबिया, बहरीन, ओमान आणि यूएई या देशांशी असणारा व्यापार ८७ अब्ज डॉलरचा असल्याचे म्हटले आहे. तसेच या देशांत काम करणाऱ्या भारतीयांची संख्या लाखोंत असल्याचे बीबीसीने म्हटले आहे. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४नंतर सातत्याने या देशांना भेटी दिल्या आहेत. अबू धाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराच्या पायाभरणी समारंभालाही मोदी उपस्थित होते. येत्या काही दिवसांत इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमिर अब्दुलाहीन भारतातला भेट देणार आहेत. त्यांच्या भेटीवर या वादाची छाया असेल, असे बीबीसीने म्हटले आहे.

भारताने या प्रकरणात काही प्रामाणिक प्रयत्न केले तर ही परिस्थिती सुधारेल, असे मत अरब देशांत भारताचे दूत राहिलेले अनिल त्रिगुणयत यांनी म्हटले आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT