Latest

शरद पवार म्हणतात, काश्मीर फाईल्सच्या प्रदर्शनास परवानगीच मिळायला नको होती

backup backup

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : काश्मीरी पंडितांच्या पलायनावर आधारित असलेल्या 'दि काश्मीर फाइल्स' चित्रपटावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा हल्लाबोल सुरुच असून सदर चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगीच मिळायला नको हवी होती, असे पवार यांनी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत बोलताना गुरुवारी सांगितले. काश्मीर फाइल्सच्या माध्यमातून भाजप तिरस्कार पसरवीत असल्याचेही पवार यांनी नमूद केले.

काश्मिरि पंडितांची भाजपला खरोखर चिंता असेल तर त्यांनी पंडितांच्या पुनर्वसनाचे काम केले पाहिजे तसेच अल्पसंख्याकाच्या बाबतीत तिरस्कार निर्माण करण्याचे टाळले पाहिजे, असे सांगून पवार पुढे म्हणाले की, काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर चुकीची माहिती पसरवून भाजपवाले देशात विखारी वातावरण तयार करीत आहेत.

खरे तर काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगीच मिळायला नको होती. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याला कर सवलतही देण्यात आली. ज्या लोकांवर देशाची एकता टिकवायची जबाबदारी आहे, तेच लोक हा चित्रपट बघण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करीत आहेत.

काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्यात आले हे खरे आहे पण त्याच प्रकारे मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले. असे सांगत या वादात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना खेचले जात असल्यावर पवार यांनी खेद व्यक्त केला.

शरद पवार : व्ही. पी. सिंग यांच्या काळात पंडितांचे पलायन

व्ही. पी. सिंग यांच्या काळात पंडितांचे पलायन झाले. त्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता. त्यावेळी मुफ्ती मोहम्मद सईद गृहमंत्री होते तर जगमोहन हे राज्यपाल होते. याच जगमोहन यांनी नंतर भाजपच्या तिकिटावर दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढविली होती.

काश्मीर फाइल्सवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या टिप्पणीवरून भाजपने त्यांना लक्ष्य केले आहे. यावरूनही पवार यांनी भाजपवर शरसंधान साधले. अल्पसंख्याकासाठी बोलल्याबद्द्ल केजरीवाल यांना लक्ष्य केले जात असल्याचे पवार म्हणाले. भाजप देशाला वेगळ्या वळणावर घेऊन जात असून यामुळे देशाची एकता खंडित होईल, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.

SCROLL FOR NEXT