भारतातील अनोखी रेल्वे स्थानके | पुढारी

भारतातील अनोखी रेल्वे स्थानके

आपल्या देशात काही अतिशय अनोखी रेल्वे स्थानके आहेत. त्यांच्याविषयी जाणून अनेक लोक थक्‍क होत असतात. ही रेल्वे स्थानके त्यांच्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांचेही आकर्षण बनलेली असतात. अशाच काही रेल्वे स्थानकांची ही माहिती…

भवानी मंडी

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात दिल्‍ली-मुंबई रेल्वे मार्गावर हे भवानी मंडी स्थानक आहे. कोटा क्षेत्रातील हे स्थानक राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये विभागलेले आहे. या स्थानकावर दोन्ही राज्यांच्या संस्कृतीची झलक दिसून येते. दोन्ही राज्यांच्या सीमेवर हे स्थानक आहे. विशेष म्हणजे याठिकाणी लोक तिकिटे घेण्यासाठी राजस्थानमध्ये उभे राहतात आणि तिकिटे देणारा क्लार्क मध्य प्रदेशात बसलेला असतो!

नवापूर

हे स्थानकही भवानी मंडीप्रमाणे दोन राज्यांमध्ये विभागलेले आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हे अनोखे स्थानक आहे. या स्थानकावरील एका बाकाचा अर्धा भाग गुजरातमध्ये तर अर्धा महाराष्ट्रात आहे! या स्थानकावर हिंदी व इंग्रजीबरोबरच गुजराती आणि मराठी भाषेतून घोषणा होते. हे स्थानक ज्यावेळी बनले त्यावेळी गुजरात आणि महाराष्ट्र एकाच संयुक्‍त मुंबई प्रांतात होते.

नामरहित स्थानक

पश्‍चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात एक अनोखे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाचे वैशिष्ट्य म्हणजे अद्याप त्याचे बारसेच झालेले नाही! हे स्थानक वर्धमान शहरापासून 35 किलोमीटरवर आहे. 2008 मध्ये बांकुरा-मॅसग्राम रेल्वेमार्गावर त्याची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी त्याचे नामकरण ‘रैनागढ’ असे करण्यात आले होते. मात्र, रैना गावातील लोकांनी त्याला विरोध केल्याने अद्याप हे स्थानक नावाशिवायच आहे!

नावाबाबत वाद

झारखंडमध्येही असेच एक रेल्वेस्थानक आहे ज्याला अद्यापही नाव नाही. राजधानी रांची ते टोरी मार्गावरील या स्थानकातून 2011 मध्ये पहिल्यांदा रेल्वे सुटली होती. रेल्वे विभागाने या स्थानकाला ‘बडकीचांपी’ असे नाव देण्याचे ठरवले होते. मात्र, कमले गावाच्या लोकांनी त्याला विरोध केला. स्थानकासाठी आम्ही जमीन दिली असल्याने स्थानकाला ‘कमले’ असेच नाव हवे असा त्यांचा आग्रह आहे. या वादामुळे अद्यापही हे स्थानक नावाशिवायच आहे!

अटारी

भारताच्या या अनोख्या रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी व्हिसाची गरज असते. याठिकाणी कुणीही व्हिसाशिवाय जाऊ शकत नाही. पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात हे स्थानक आहे. याठिकाणी जर व्हिसाशिवाय कुणाला पकडले गेले तर त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद होऊ शकतो. या स्टेशनवरून समझोता एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जातो.

हेही वाचलंत का? 

Back to top button