भाजपचा ईशान्येतही दबदबा; राज्यसभेच्या सर्व चारही जागा जिंकल्या, काँग्रेसचा सुफडासाफ | पुढारी

भाजपचा ईशान्येतही दबदबा; राज्यसभेच्या सर्व चारही जागा जिंकल्या, काँग्रेसचा सुफडासाफ

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

भाजप आणि त्यांच्या एका मित्रपक्षाने गुरुवारी ईशान्येकडील राज्यसभेच्या (Rajya Sabha seats) सर्व चारही जागा जिंकल्या. यामुळे संसदीय इतिहासात प्रथमच काँग्रेसला (Congress) वरिष्ठ सभागृहात ईशान्येतून प्रतिनिधित्व मिळालेले नाही. भाजपने संख्याबळाच्या जोरावर त्रिपुराची जागेवर विजय मिळवला. तर नागालँडची जागा बिनविरोध जिंकली, तर आसाममध्ये क्रॉस-व्होटिंग आणि अवैध विरोधी मतांमुळे भाजप आणि त्याचा मित्र पक्ष यूपीपीएल (UPPL) यांना दोन्ही जागा जिंकण्यात मदत झाली.

या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी म्हटले आहे की, आम्हाला काँग्रेस आमदारांची सात मते मिळाली. १२६ सदस्यीय विधानसभेत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना राज्यसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी चार मतांची आवश्यकता होती. यामुळे विरोधी पक्षाकडे एक जागा जाण्याची शक्यता होती.

आसामच्या दोन जागांवर भाजपचे पाबित्रा मार्गेरिटा आणि यूपीपीएलचे रवंगरा नारजारी यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान राज्यसभा खासदार रिपून बोरा यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीनंतर NDAकडे आता या प्रदेशातून वरिष्ठ सभागृहातील १४ पैकी १३ जागा आहेत. आसाममधील एक जागा अपक्षाकडे आहे.

भाजपने नागालँडची जागा बिनविरोध जिंकली आहे जी त्यांचा मित्रपक्ष एनपीएफकडे होती. त्रिपुरात सीपीएमने (CPM) त्यांची जागा गमावली आहे. त्रिपुरात भाजपचे उमेदवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनी सीपीएमचे उमेदवार भानू लाल साहा यांचा पराभव केला. नागालँडमध्ये भाजपच्या एस फांगनॉन कोन्याक यांनी राज्याच्या राजकारणात इतिहास रचला आहे. नागालँडमधून राज्यसभेवर निवडून गेलेल्या त्या महिला बनल्या आहेत.

Back to top button