Latest

नाशिककरांच्या हक्काच्या रेल्वेची पळवापळवी; रेल्वे मंत्रालयाकडून दुय्यम स्थान

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रदिनी धुळे-मुंबई थेट रेल्वेगाडीचा शुभारंभ केला. आठवड्यातून ३ दिवस धावणाऱ्या या गाडीमुळे धुळेकरांचे वर्षानुवर्षाचे स्वप्न सत्यात उतरले. पण धुळेवासीयांची स्वप्नपूर्ती होत असताना रेल्वेने नाशिककरांची 'गोदावरी'च पळविली आहे. जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाच्या अनास्थेमुळे आणि रेल्वे मंत्रालयाच्या दुय्यम वागणुकीमुळे नाशिकची 'गोदावरी' आता 'तापी'च्या अंगणात दिमाखात नांदणार आहे.

रेल्वेच्या बाबतीत नाशिक आणि अन्याय हे जणू काही समीकरण बनले आहे. वर्षानुवर्षे नाशिकला राजधानी मुंबईशी कनेक्ट करणाऱ्या रेल्वेगाड्या पळविण्याचे पाप रेल्वे मंत्रालयाकडून सातत्याने सुरूच आहे. सर्वप्रथम नाशिककरांची तपाेवन औरंगाबाद व तेथून नांदेडपर्यंत पळविण्यात आली. २००९ मध्ये सुरू केलेली नाशिक-पुणे (व्हाया कल्याण-पनवेल) प्रथम मनमाडपर्यंत नेली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ही रेल्वे थेट भुसावळपर्यंत नेण्यात आली. अर्थात जिल्हावासीयांच्या सुविधेसाठी सुरू केलेली गाडी खानदेशपर्यंत नेण्यात नाशिकमधील तत्कालीन लोकप्रतिनिधींचा मोलाचा वाटा आहे. निवडणुकीत सिडको-सातपूर पट्ट्यातील खानदेशवासीयांनी दिलेल्या मतांची परतफेड म्हणून ही गाडी थेट भुसावळच्या अंगणात पोहचल्याची चर्चा आजही आहे.

कोरोनाकाळात बंद असलेली मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस थेट नांदेडपर्यंत नेण्यात आली. ही गाडी तेथपर्यंत नेण्यासाठी नांदेडच्या लोकप्रतिनिधींनी थेट केंद्र सरकारवर दबावतंत्र वापरले. मात्र, संघर्षातून सुरू झालेली हक्काची राज्यराणी पळविण्यामागे नाशिकच्या लोकप्रतिनिधींची अनास्था कायम आहे. दरम्यान, आता थेट नाशिकची गोदावरीच तापीच्या दिमतीला जाऊन पाेहोचली आहे. एकेकाळी नाशिककरांची शान असलेली गोदावरी एक्स्प्रेस काेरोनात तब्बल दोन वर्षे बंद होती. प्रवाशांच्या आंदोलनामुळे कशीबशी रेल्वे मंत्रालयाने स्पेशल गाडी म्हणून चार महिन्यांपूर्वी ती पुन्हा रुळावर आणली. मात्र, ही गाडी सुरू करताना रेल्वे मंत्रालयाने धुळ्यापर्यंत ती नेण्याचा घाट घातला होता. याबाबत वेळोवेळी कुणकुण ही सुरू होती. परंतु, नाशिककरांची जीवनवाहिनी असलेल्या या रेल्वेसाठी एकही लोकप्रतिनिधी पुढे आला नाही हे विशेष. त्यामुळे अखेर प्रवाशांनीच गोदावरी वाचविण्यासाठी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

पंचवटीचा वनवास कायम

काेरोनानंतर पंचवटी एक्स्प्रेस रुळावर आली. परंतु, ही गाडी सुरू करतानाही रेल्वे मंत्रालयाची सापत्न वागणूक कायम आहे. पंचवटीचा रेकमुळे चाकरमान्यांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच हा रेक दुसरीकडे शेअरिंग केला जात असल्याने त्यात अस्वच्छता, पाण्याची समस्या भेडसावते. या सर्वांवर कडी म्हणजे मुंबईहून परतताना आठवड्यातून किमान दोन दिवस गाडीला लेट होतो. त्यावर कोणीच आवाज उठवित नसल्याने वेळप्रसंगी पंचवटी इतरत्र पळविली जाऊ शकते.

प्रवाशांकडून संतप्त सवाल

खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांच्या कारकिर्दीत मुंबई-दिल्ली राजधानी सुरू केली. नाशिक-कल्याण लोकलसह कसारा घाटात अतिरिक्त रेल्वेलाइनसाठी ते पाठपुरावा करताहेत. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी मध्यंतरी नांदगावी काही रेल्वेगाड्यांचा थांबा पूर्ववत करत प्रवाशांना दिलासा दिला. पण नाशिककरांची राज्यराणी, गोदावरी पळवून नेली असताना खासदारांनी अथवा आमदारांनी अजूनही विरोध केलेला नाही. त्यामुळे 'सांगा तुम्हाला कशासाठी मते द्यायची?' असा संतप्त सवाल प्रवाशांकडून केला जाताेय.

रेल्वे नव्हे समस्यांचे स्थानक


-नाशिकरोडच्या फलाट ४ चा कमी वापर.
-इगतपुरी-नाशिक-मनमाड तिसरी लाइन कागदावर
– नाशिकरोड स्थानकाच्या नूतनीकरणाला मुहूर्त लागेना
-नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचे घोंगडे भिजत

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT