पुणे : ज्युबिलंटने खत प्रकल्प बंद करावा ; निंबुत ग्रामपंचायतीची लेखी मागणी | पुढारी

पुणे : ज्युबिलंटने खत प्रकल्प बंद करावा ; निंबुत ग्रामपंचायतीची लेखी मागणी

सोमेश्वरनगर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  निंबुत (ता. बारामती) हद्दीतील ज्युबिलंट कंपनीच्या खत प्रकल्पामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. परिणामी, हा खत प्रकल्प बंद करण्याची मागणी निंबुत ग्रामपंचायतीने कंपनीला पत्राद्वारे केली आहे. तसेच कायदेशीर कारवाईचा इशारा देत 8 दिवसांत लेखी उत्तर देण्याची मागणी पत्रातून केली आहे. या संदर्भात निंबुतच्या सरपंच निर्मला काळे यांनी ज्युबिलंट कंपनीस पत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, ज्युबिलंट कंपनीमध्ये उसाच्या कच्च्या मटेरियलपासून खतनिर्मिती केली जाते, त्यामुळे गावात मच्छर, माशांसह अनेक किटकांचा प्रार्दुभाव वाढला आहे. सध्या गावठाणासह लक्ष्मीनगर, आनंदनगर, बी. जी. काकडेवस्ती परिसरात डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजारांनी अनेकांना ग्रासले आहे. तर कंपनीतून येणार्‍या उग्र वासाने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अनेकांना श्वसनाचे त्रास होत आहेत.

तर काही जणांच्या उपजीविकेचे साधन असलेली निरा नदीतील मासेमारीही धोकादायक आली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत मासे सापडू लागले आहेत. याशिवाय निरा- बारामती मार्गावर खत प्रकल्पातून येणार्‍या वाहनांतून वारंवार मळी पडते, त्यामुळे अनेकांना अपघात घडत आहेत. तर रस्त्याची दुरवस्थादेखील होत आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान ग्रामपंचायतीच्या या पत्रावर कंपनी प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.फ

कंपनीकडून या ठिकाणी सातत्याने फॉगिंग केले जाते. 22 एप्रिल रोजी फॉगिंग करण्यात आले होते. त्यानंतर 5 मे रोजी पुन्हा करण्यात आले आहे. स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
                                          -इसाक मुजावर, जनसंपर्क अधिकारी, ज्युबिलंट

 

Back to top button