वैशाखात पक्ष्यांना जांभूळ, तुती, उंबराचाच आधार | पुढारी

वैशाखात पक्ष्यांना जांभूळ, तुती, उंबराचाच आधार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वैशाख महिन्यात उष्णतेने व्याकूळ झालेल्या पक्ष्यांचे पोषण काही झाडे करतात. त्यात जांभूळ, तुती व औदुंबराची फळे हाच आधार बनल्याचे दिसत आहे. बुलबुल, धनेश, पोपट, चष्मेवाला, कोकीळ हे पक्षी चोचीत फळे घेऊन घरट्याकडे जाताना पक्षिमित्र विश्वजित नाईक यांनी त्यांच्या कॅम्प भागातील बंगल्याच्या बागेत टिपलेले छायचित्र.

एप्रिल व मे हा महिना प्रचंड उकाड्याचा असतो. यंदा पाऊस असला, तरीही तापमानाचा पारा जास्त आहे. प्रचंड उष्मा शहरात जाणवत आहे. अशा वेळी पक्ष्यांना ग्लुकोजची गरज पडते. वैशाख महिन्यात उन्हाळी मेवा खाऊन पक्षी जगतात. यात जाभूळ, आंबा, तुती, औदुंबराची फळे पक्षी खातात. त्यातील ग्लुकोज पक्ष्यांसाठी प्रचंड उकाड्यात आधार ठरते.

या सर्वच झाडांवर सध्या पक्ष्यांची गर्दी दिसत आहे. शहरातील पक्षिनिरीक्षक विश्वजित नाईक यांनी सांगितले, की मार्च अखेरपासून हे पक्षी खास करून तुती,औदुंबराच्या झाडावर गर्दी करतात. त्याची छोटी छोटी फळे खाल्ल्याने त्यांना उष्माघात होत नाही. ही दोन्ही झाडे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसतात, मात्र जांभूळ,आंबा त्यांना शोधत जावे लागते.

Back to top button