सातारच्या दौर्‍यात शरद पवार बेहद्द खूश! म्हणाले, ‘अजित लक्ष घालतोय यात आनंद’ | पुढारी

सातारच्या दौर्‍यात शरद पवार बेहद्द खूश! म्हणाले, ‘अजित लक्ष घालतोय यात आनंद’

सातारा; हरीष पाटणे :  अलीकडच्या काही दिवसांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाहीर कौतुक करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत त्यांनी अजितदादांच्या कामाच्या पद्धतीला शाबासकी दिली तर कोरेगावच्या सभेत विरोधी पक्षनेता म्हणून अजितदादांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेबाबतही ‘अजित लक्ष घालतोय याचा आनंद आहे’ असे म्हणत पवारांनी अजितदादांचे सातार्‍यात कौतुक केले. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्यात तर त्यांनी अजितदादांचा जाहीर सत्कार केला. काकांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना पुतणे अजितदादांच्या गालावर गुलाब फुलल्यासारखी त्यांची कळी खुलली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यामध्ये धुसफुस असल्याचे कायम बोलले जाते. अजितदादा शरद पवारांवर नाराज आहेत, अशा कंड्या पिकवल्या जातात. शरद पवारांच्या राजीनाम्यावेळी अजित पवारांची देहबोली वेगळी होती. त्यावरूनही जोरदार रान उठवले गेले. प्रत्यक्षात मात्र राजीनामा नाट्यावेळी शरद पवार यांनी जे सांगितले होते तीच भूमिका प्रतिभा पवार यांना समोर ठेवत अजितदादा राबवत होते. विशेष म्हणजे त्यावेळीही आक्रमक असलेल्या अजितदादांना शरद पवारांनी अजिबात थांबवले नव्हते. उलट त्यानंतर अजितदादांसंदर्भात मुलाखत देताना शरद पवार म्हणाले, आक्रमक स्वभावामुळे अजितबद्दल गैरसमज होतात. अजितला प्रसिद्धीची अजिबात आवड नाही. तो मीडिया फ्रेंडली नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल गैरसमज होतात. त्याला काम करायला जास्त आवडते. सतत कामात राहणे हा अजितचा स्वभाव आहे. त्याच्याबद्दलचे गैरसमज चुकीचे आहेत, अशा शब्दात पवारांनी अजितदादांचे जाहीर कौतुक केले होते.

सातार्‍यात पत्रकार परिषदेत अजितदादांसंदर्भात प्रश्न आला तेव्हांही शरद पवार यांनी अजितदादांबद्दल कौतुकोद्गार काढले.
कोरेगावच्या सभेत विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी राज्यातील भ्रष्टाचार, अधिकार्‍यांची मनमानी या विषयावर तुफान टीका केली. हे शरद पवारांच्या निदर्शनास आणून देताच ते म्हणाले, राज्याच्या विरोधी पक्षनेत्याचे ते कामच आहे. प्रशासकीय चुकीच्या बाबींवर विरोधी पक्षनेत्याला बोलावे लागते. अजित लक्ष घालत असेल तर मला त्याचा आनंद आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्यात रयत शिक्षण संस्थेला देणगी देणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. त्यात रामशेठ ठाकूर यांचा शरद पवार यांनी सत्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रयत शिक्षण संस्थेला देणगी दिल्याबद्दल अजितदादांचे नाव सत्काराला घेतले गेले. शरद पवार यांच्या हस्ते अजितदादांचा सत्कार होत असताना समोरून जोरदार टाळ्या पडल्या. विशेष म्हणजे शरद पवार व अजितदादा दोघेही या सत्कारावेळी खळखळून हसले. काका-पुतण्याच्या नात्यांमधला बदललेला हा नवा रंग पाहताना रयतच्या व्यासपीठासह तोबा गर्दीलाही अप्रूप वाटले.

Back to top button