Latest

Migratory Crabs Research : गोड्या पाण्यातील खेकडेही करतात स्थलांतर! संशाेधक जाणून घेणार कारण

सोनाली जाधव

स्थलांतर हा प्राण्यांचा, पक्ष्यांचा आणि माणसांचा स्थायीभाव आहे; पण गाेड्या पाण्‍यातील खेकडेही स्थलांतर करतात असं कधी पाहिलं आहे का? तर हो! खेकडेही स्थलांतर करतात. आता यावर संशोधन होणार आहे. गोड्या पाण्यातील खेकड्यांच्‍या स्‍थलांतरावर संशोधन होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. सातारचे सुनील भाेईटे मुख्य संशोधक असून गायत्री पवार या सहाय्यक संशोधक आहेत.  (Migratory Crabs Research)

लाल खेकडे

Migratory Crabs Research : खेकड्यांच्या सहा प्रजातींचा होणार अभ्यास 

या संशाेधनाबाबत सुनील भोईटे आणि गायत्री पवार सांगतात की, गाेड्या पाण्‍यातील खेकड्याच्‍या स्थलांतराच्‍या अभ्यासात पश्चिम घाटातील सहा खेकड्यांच्या प्रजातींचा समावेश केला आहे. यामध्ये पुढील  प्रजातींचा समावेश आहे…

  • सह्यादीयाना अल्कोकी
  • बारुसा ग्रासीलिमा
  • वैरीटेलपुसा कैनीक्युलारीस
  • घाटीयाना पुल्क्रा
  • इंग्लेथेपुसा फ्राँटो
  • सहावी प्रजाती आहे तिची अद्याप ओळख पटलेली नाही.
खेकड्यांच्या सहा प्रजातींचा होणार अभ्यास

या संशाेधनाबाबत माहिती देताना सुनील भोईटे यांनी सांगितले की, "या सहा प्रजाती पश्चिम घाटात दोन ते तीन ठिकाणीच आढळून येतात. जगभराचा विचार केला तर  या प्रजाती पश्चिम घाटासाठी प्रदेशानिष्ठ असल्याचे आढळून येते. यामुळे या प्रदेशामधील प्रजातींना पर्यावरणदृष्ट्या अधिक महत्त्व असून, पश्चिम घाटासाठी अमूल्य असा हा जैविक वारसा आहे.

गोड्या पाण्यातील खेकड्यांच्‍या स्‍थलांतरावर संशोधनाची पहिलीच वेळ

महादरे इकोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात 'मेरी' (Mahadare Ecological Research Institute – MERI) या संस्थेचे मुख्य संशोधक सुनील भोईटे आणि गायत्री पवार (सहाय्यक संशोधक) यांच्याकडून गोड्या पाण्यातील खेकड्यांवर संशोधन केले जाणार आहे. संशोधकांनी पश्चिम घाट हा भौगोलिक परिसर संशोधनासाठी निवडला आहे. भारतात गोड्या पाण्यातील खेकड्यांच्‍या स्‍थलांतरावर संशोधन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे गोड्या पाण्यातील खेकड्यांसंदर्भात विविधांगी माहिती समोर येवू शकते. या संधोधनासाठी आणि हंगामी सर्वेक्षणासाठी 'डब्लू डब्लू एफ'नेही IND (World Wide Fund for Nature) सहकार्य करत असल्याचेही संशोधक सुनील भाेईटे यांनी सांगितले.

या संधोधनासाठी आणि हंगामी सर्वेक्षणासाठी डब्लू डब्लू एफ IND (World Wide Fund for Nature) सहकार्य करत आहे.

खेकड्यांच्या वर्तनशास्त्र व स्थलांतराचा अभ्यास

गेले ८ महिने आम्ही गोड्या पाण्यातील खेकड्यांवर अभ्यास करत आहोत. पुढील दीड ते दोन वर्ष हे संशोधन सुरु राहील. काही कालावधीनंतर पुन्हा सुप्त अवस्थेत जाणाऱ्या खेकड्यांविषयी हा अभ्यास केला जात आहे.या प्रदेशातील ज्या प्रजाती अभ्यासासाठी निवडल्या आहेत त्‍या विशिष्ट हंगामातच पठारावर येतात. या संशोधन प्रकल्पातून पश्चिम  घाटाच्या पठारांवरील खेकड्यांच्या वर्तनशास्त्र व स्थलांतराचा अभ्यास केला जाणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक लोक आहेत त्यांना या प्रजातीसंदर्भात योग्य ती माहिती देत जनजागृतीही केली जाणार आहे. जसे बरेच पक्षी, प्राणी हे हजारो किलोमीटर पार करुन स्थलांतर करतात. तसे हे गोड्या पाण्यातील खेकडेही स्थलांतर करतात. गोड्या पाण्यातील खकडे हे साधारणत: 3 ते ५ किलोमीटर पर्यंत स्थलांतर करतात, असेही भाेईटे यांनी सांगितले.

Migratory Crabs Research : नावीन्यपूर्ण माहिती हाती मिळेल

भारतात गोड्या पाण्यातील खेकड्यांच्‍या स्‍थलांतरावरील संशोधन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संशोधन प्रकल्पांमुळे लाल खेकड्यांची बरीच नावीन्यपूर्ण माहिती मिळू शकते. जी जैविकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संशोधनात गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला जाणार आहे. गोड्या पाण्यातील खेकडे का स्थलांतर करतात. त्यांचा मानवी जीवनाशी काही सहसंबंध आहे का? पर्यावरसृष्टीतील त्यांचे महत्त्व, त्यांचे अस्तित्व निसर्गातील का गरजेचे आहे, आदी या संशाेधनात स्पष्ट होतील. पुढील संशोधकांना ज्यांना या विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी ती नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्‍वासही संशाेधक व्‍यक्‍त करतात.

Migratory Crabs Research

MERI :'मेरी' विषयी हे माहित आहे का?

महादरे इकोलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात 'मेरी' (Mahadare Ecological Research Institute – MERI) ही साताऱ्यामध्ये २०१७ पासून कार्यरत असून, ती एक स्वंयसेवी संस्था आहे.नवसंशोधक आणि मुक्तसंशोधक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करते. या संस्थेअंतर्गत जीवशास्त्र क्षेत्रातील विविध विषयांवर संशोधन केले जात आहे. २०२२ मध्ये साताऱ्यामधील महादरे हे भारतातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून नावारुपाला आले. पहिल्यावहिल्या फुलपाखरू संवर्धन राखीव केंद्रास (Butterfly) मान्यता मिळाली. त्यामध्ये मेरी या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे.
Migratory Crabs Research
२०१७  पासून महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुक्त संशोधक दरे (खु.) महादरे येथील जंगल परिसरात जैवविविधतेचा अभ्यास करत होती. तब्बल पाच वर्षे अभ्यास केल्यानंतर या टीमला विविध जातीच्या फुलपाखरांचा अधिवास महादरे  येथे असल्याचे आढळून आला. यामध्ये पश्‍चिम घाटातील दुर्मीळ समजल्या जाणार्‍या फुलपाखरांचा यात समावेश होता. पश्चिम घाटातील ३४१ पैकी १७८ फुलपाखरांच्या प्रजाती येथे आढळतात. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT