Goa Forest Fire : पश्चिम घाट जळतोय, जंगलातील अग्नितांडवामुळे दुर्मिळ जैवविविधता नष्ट! | पुढारी

Goa Forest Fire : पश्चिम घाट जळतोय, जंगलातील अग्नितांडवामुळे दुर्मिळ जैवविविधता नष्ट!

पुढारी ऑनलाइन डेस्क : गोव्यातून जाणारा पश्चिम घाटातील जंगलात वणवा पेटला आहे. येथील जंगलात गेल्या सहा दिवसांपासून आग लागली असून गोव्याच्या इतिहासातील हे सर्वात भीषण अग्नितांडव असल्याचे मानले जात आहे. सहा दिवसांपासून अद्यापही आगीवर पूर्णपणे नियंत्रण न मिळवता आल्याने जंगलातील दुर्मिळ जैवविविधता नष्ट होत आहे. दरम्यान, पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत ही आग आटोक्यात येऊ शकते असे अधिका-यांनी सांगितले आहे. (Goa Forest Fire)

पश्चिम घाट हा जगातील आठ जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक आहे. पश्चिम घाटातील या जंगलात सहा दिवसापूर्वी आग (Goa Forest Fire) लागली आणि वणवा पसरला. गोव्यातील ही जंगले सहाव्या दिवशीही जळत आहे. अग्निशामक दल सातत्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही आग विझवण्यासाठी बांबी बकेटचा वापर करत आहे. मात्र, दूर्गम भाग, तीव्र वारे आणि उच्च तापमानामुळे आग विझवण्यात अडथळे येत आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने नौदल आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. त्यानुसार बांबी बकेटचा वापर करून नौदल आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने अग्निशमन मोहिमे सुरू ठेवली आहे. AF चे Mi-17 हेलिकॉप्टर अंडरस्लंग बांबी बकेट (औपचारिकपणे लार्ज एरिया एरियल लिक्विड डिस्पर्सल इक्विपमेंट म्हणून ओळखले जाते) या प्रयत्नांमध्ये सामील झाले आणि आग प्रभावित भागात जवळपास 22,000 लिटर पाणी ओतले आहे, अशी माहिती वनविभागाच्या अधिका-यांनी दिली आहे. वनविभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, सध्या आग विझवणे हे प्राधान्य आहे.

Goa Forest Fire : वनमंत्री राणे यांना आग मानवनिर्मित असल्याचा संशय

जंगलात भडकलेल्या या भीषण आगीबाबत बोलताना वनमंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी आगीचे कारण शोधण्यासाठी वनविभागाने “तपास” केला आहे. मात्र, ही आग मानवनिर्मित असू शकते असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने नैदल आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची मागणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हवामानातील बदल हे आगीचे कारण असू शकत नाही – वनसंरक्षक डिसोझा

“मी 1977 पासून गोव्यात आहे आणि मी पाहिलेल्या या सर्वात भीषण आग आहेत. संपूर्ण जगभरात, सदाहरित जंगलांना लागलेल्या आगी नेहमीच मानवनिर्मित असतात. सदाहरित जंगलांना आग लागत नाही कारण ते ओलसर असतात. तिथे काही बदमाश असावेत. . त्यांच्या अतिक्रमणांचा विस्तार करणाऱ्या लोकांनी आग लावली असावी,” असे माजी मुख्य वनसंरक्षक रिचर्ड डिसोझा म्हणाले. ते म्हणाले की, हवामानातील बदल हे आगीचे कारण असू शकत नाही.

Goa Forest Fire : उपवनसंरक्षकांची नियुक्ती

वनविभागाने आगींवर लक्ष ठेवण्यासाठी एक समर्पित नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे आणि विविध वनक्षेत्रांवर लक्ष ठेवण्यासाठी उपवनसंरक्षकांची नियुक्ती केली आहे. मोलेमजवळील दुर्गम भागात स्थानिक लोकांच्या सुमारे 50 स्वयंसेवकांसह आगीशी लढण्यासाठी राज्याने सुमारे 800 कर्मचारी तैनात केले आहेत, अशी माहिती वन अधिका-यांनी दिली आहे.

हेही वाचा 

Back to top button