पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर राज्यातील राजकीय घडामाेडी कमालीच्या वेगावल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाने राज्य सरकारवर तोंडसुख घेतले आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून ठाकरे गटाने भाजपवर हल्लाबोल केला आहे. (Maharashtra Politics )
सामनाच्या अग्रलेखात नमूद केले आहे की, भाजपने महाराष्ट्रात जे काही केले त्यांचीच संपूर्ण देशात बदनामी हाेत आहे. आता फक्त मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय मल्ल्या यांनाच त्यांच्या पक्षात सामील करून पदे द्यायचे बाकी राहिले आहे. या तिघांपैकी एकाची पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी, दुसर्याची नीती आयोगावर आणि तिसर्याची देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करावी. कारण भ्रष्टाचार, लूट, नैतिकता हा त्यांच्यापुढे मुद्दा राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस वारंवार अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात जावे लागेल असे सांगत होते, परंतु त्यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा व्हायला हवी होती; पण अजित पवार आणि त्यांचा गट 'सागर'पर्यंत पोहोचला. हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांची ही स्थिती अस्वस्थ करणारी असून दिवसेंदिवस दयनीय होत जाणार आहे. दीपक केसरकर यांनी १५ दिवसांपूर्वीच म्हटले होते की, बंड फसले असते तर शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडली असती. आता गृहमंत्री फडणवीस यांनी 'वर्षा' बंगल्याची सर्व हत्यारे तातडीने सरकारकडे जमा करावीत. देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री होते, नंतर शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. आता अजित पवारही पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे फडणवीस अर्धे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. महाराष्ट्राची ही अवस्था 'एक फुल, दो हाफ' अशी झाली आहे, पण जे फुल आहेत तेही चिंताग्रस्त चेहऱ्याने फिरत आहेत, असेही अग्रलेखात म्हटले आहे.
शिवसेना ज्या प्रकारे आपल्या जागी कायम आहे, तेच चित्र राष्ट्रवादीच्या बाबतीतही दिसून येत आहे. दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी साताऱ्याकडे गेले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोकांनी रस्त्यावर रांगा लावल्या होत्या. राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्यांपैकी काही आमदारांनी पवारांना हार-फुले घालून स्वागत केले. हे चित्र आशादायक आहे. जयंत पाटील यांच्या जागी प्रफुल्ल पटेल यांनी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली, हा बालिशपणा आहे. या सगळ्यामागचे खरे सूत्रधार दिल्लीत आहेत. घाटींचे जे झाले तेच नव्याने फुटलेल्या गटाचेही होत आहे. 'एक (संशय) फुल, दो हाफ' हा नवा चित्रपट राज्यात प्रदर्शित झाला असला तरी लोकांनी यावर बहिष्कार टाकला आहे, असेही सामन्याच्या अग्रलेखात नमूद केले आहे.
हेही वाचा :