शरद पवार हे श्रीकृष्ण तर, अजित दादा अर्जुनाच्या रूपात; मात्र आम्हा कार्यकर्त्यांचा अभिमन्यू झालायं: प्रदीप गारटकर | पुढारी

शरद पवार हे श्रीकृष्ण तर, अजित दादा अर्जुनाच्या रूपात; मात्र आम्हा कार्यकर्त्यांचा अभिमन्यू झालायं: प्रदीप गारटकर

पुणे, पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी नंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असून शरद पवार की अजित पवार यांच्या सोबत जायचं अशा गोंधळलेल्या अवस्थेत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. या दरम्यान ५ जुलैला शरद पवार आणि अजित पवार यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण आता नेमकं कोणासोबत जायचं? यावर राज्यातील अनेक भागात राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी धनकवडी येथील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात केली होती.

या बैठकीनंतर जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सध्याची अवस्था लक्षात घेता आमच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी शरद पवार श्रीकृष्ण यांच्या रूपात आहेत आणि अजित पवार अर्जुनाच्या रूपात आहेत. तर आम्हा कार्यकर्त्यांचा अभिमन्यू झाला असून आम्ही शरद पवार की अजित पवार यांचे, या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण झाले आहे.” अशी भूमिका गारटकर यांनी मांडली.

तसेच ते पुढे म्हणाले की, “राज्यात घडलेल्या सत्ता नाटयामुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहेत.या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला १३ जिल्ह्यांपैकी पाच तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित राहू शकले नाही. यामधील काहींच्या स्थानिक स्तरावर बैठका सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, आज झालेल्या बैठकीमध्ये शरद पवार की अजित पवार यांच्या सोबत जायचं, याबाबत कोणताही निर्णय झाला नसून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.” असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

IDFC merge with IDFC First Bank | एचडीएफसी नंतर आता आणखी एका बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा

संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिका गंभीर जखमी

Prithvi Shaw Captain : पृथ्वी होणार टीम इंडियाचा कर्णधार? BCCI मोठा निर्णय घेण्याची शक्यता

 

Back to top button