मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Maharashtra ATS ) जाकीर हुसेन शेख आणि रिझवान इब्राहिम मोमीन या संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे इरफान रेहमत अली शेख (५०) याला अटक केली आहे.
शेख हा व्यवसायाने शिंपी असून एटीएसने त्याला वांद्रे येथून ताब्यात घेत ही कारवाई केली आहे.
एटीएसने (Maharashtra ATS) त्याच्या जवळून काही रक्कमसुद्धा जप्त केल्याची माहिती मिळते.
धारावीतील दहशतवादी जान मोहम्मद अली शेख उर्फ समीर कालिया याच्यासह एकूण सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली.
पुढे राज्य एटीएसने धडक कारवाई करत विदेशात स्थायिक असलेल्या अँथॉनी उर्फ अनवर उर्फ अनस याच्या संपर्कात काही जण असल्याचे समजताच याप्रकरणी गुन्हा दाखल करून लूक आऊट सर्क्युलर जारी केले.
कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्या संपर्कात असलेल्या आणि जान मोहम्मदचा हॅन्डलर म्हणून काम करणाऱ्या जाकीर याला मुंबईच्या जोगेश्वरी भागातून त्यानंतर, मुंब्रा येथून रिझवान इब्राहिम मोमीन याला ताब्यात घेत अटक केली.
एटीएसने नुकताच या दोघांचा न्यायालयाकडून ताबा घेत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे.