पालघर : पुढारी वृत्तसेवा : पालघर जिल्ह्यात यापुढील चार दिवस हवामान खात्याने रेडअलर्ट जारी केला आहे. बुधवार सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मनोर – पालघर महामार्गावरील वाघोबा खिंडीत दरड कोसळून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु, दोन जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या साहाय्याने माती बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती शासकीय यंत्रणेने दिली आहे.
वसई तालुक्यातील वालीव पोलीस स्टेशन हद्दीतील राजीवली गावातील वाघराळपाडा भागात एका चाळीवर दरड कोसळली. यामध्ये वडील आणि मुलगी मातीखाली दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उर्वरित दोघांना अधिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अमित ठाकुर (वय ३५, वडील), रोशनी ठाकुर (वय १४, मुलगी) अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते.