गौतम बचुटे/केज : साळेगावजवळ एका बोलेरो जीप आणि ऊस बगॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली. या भीषण अपघातात जीपचा चक्काचूर झाला असून, जीपच्या चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. खामगाव- सांगोला महामार्गावर केज ते साळेगाव दरम्यान साळेगाव येथील शंकर विद्यालयाजवळ बुधवारी (दि. १३) पहाटे ४ वाजता हा अपघात झाला.
या अपघातात बोलेरो जीपने (एम एच-२०/डी जे- ९५६३) ऊस बगॅसची वाहतूक करणाऱ्या ट्रकला (एम एच-०९/सी ए-४५९०) समोरून जोराची धडक दिली. यात बोलेरो जीपमधील ड्रायव्हर सोनू अन्सारी शेख (वय-२५ वर्ष) आणि मधल्या सीटवर झोपलेले नशीर बशीर शेख (वय-३६ वर्ष) हे दोघेही (रा. थेटेगव्हाण ता. धारूर) गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालकाने रुग्णवाहिका आणि पोलीसांशी संपर्क साधून जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले.
यामधील नशीर बशीर शेख याला डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर सोनू अन्सारी शेख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूर येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू गुंजाळ घटनास्थळी पोहतच पंचनामा केली आहे. पोलीसांनी ट्रक ड्रायव्हर रविंद्र महादेव रुपनर (रा. नातेपुते, जि. सोलापूर) याच्यासह अपघातातील ट्रक ताब्यात घेतला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.